भारतात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात आणि प्रत्येकाची वागणूक वेगळी असते. काही साप अतिशय लाजाळू असतात; ते माणसापासून दूर पळून जातात आणि कधीही हल्ला करत नाहीत. तर काही साप प्रचंड आक्रमक असतात आणि कधीही हल्ला करू शकतात. त्यामुळे कोणताही साप दिसला तरी त्याला पकडण्याचा प्रयत्न कधीही करू नये. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना द्यावी, कारण ते सापाला सुरक्षितपणे पकडून योग्य ठिकाणी सोडतात.
रात्रीचे साप अधिक धोकादायक का असतात?
काही साप दिवसा शिकार करतात आणि रात्री बिळात दडून बसतात. असे साप दिवसाच्या उजेडात लगेच दिसून येतात, त्यामुळे त्यांच्यापासून फारसा धोका नसतो. मात्र काही साप दिवसा बिळात आराम करतात आणि रात्रीच्या अंधारात शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. अंधारामुळे असे साप दिसत नाहीत आणि आपण झोपेत असताना ते आपल्याजवळही येऊ शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी अशा सापांपासून होणारा धोका जास्त असतो.
सर्पमित्रांनी सुचवलेले सोपे उपाय
रात्री मोकळ्या मैदानात किंवा घराच्या अंगणात झोपायचे असेल तर कधीही थेट जमिनीवर झोपू नये; बाज किंवा पलंगाचा वापर करावा. बेडवर रंगीबेरंगी किंवा काळी चादर अंथरू नये, कारण अशा चादरीवर साप लवकर दिसत नाही. त्याऐवजी पांढरी चादर वापरली तर त्यावर साप लगेच दिसून येतो. ग्रामीण भागात घरांमध्ये साप शिरण्याचे प्रमाण जास्त असते. अशा ठिकाणी घरात घुशींची किंवा उंदरांची बिळे असतील तर ती तशीच सोडून देऊ नयेत; ती कायमस्वरूपी बुजवून टाकावीत आणि घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. या छोट्या सवयींमुळे रात्रीच्या वेळी सापांपासून होणारा धोका बराच कमी होतो.
Leave a Reply