थंडीच्या दिवसांत रात्रीच्या जेवणात गरमागरम झुणका-भाकरीचा बेत असेल, तर जेवणाची मजा काही औरच असते. महाराष्ट्राच्या घराघरांत परिचित असलेला हा पदार्थ कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो. आजीच्या पद्धतीने बनवलेला खमंग झुणका आणि ज्वारीची फुगलेली भाकरी यांचा बेत थंडीत आवर्जून करून पाहण्यासारखा आहे.
झुणक्यासाठी लागणारे साहित्य
झुणका बनवण्यासाठी एक वाटी बेसन, दोन बारीक चिरलेले कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, तेल, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. भाकरीसाठी ज्वारीचे पीठ लागते.
झुणका कसा बनवायचा
सुरुवातीला कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी आणि जिरे घालावेत. त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले परतून घ्यावे. या फोडणीमुळेच झुणक्याला छान चव येते. आता फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे.
दुसरीकडे एका भांड्यात बेसन घ्यावे. त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करावे. बेसनाचे मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे. आता कांद्याच्या फोडणीत बेसनाचे मिश्रण घालावे. मंद आचेवर सतत हलवत शिजवावे. बेसनातील पाणी आटून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. झुणका चांगला शिजल्यावर त्याला छान मोकळी रचना येते.
भाकरी आणि वाढणी
भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ घ्यावे. त्यात थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्यावे. त्यानंतर हाताने किंवा पाटावर भाकरी थापावी. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यावी. भाकरी छान फुगल्यावर तव्यावरून उतरवावी. तयार झुणक्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमागरम झुणका ज्वारीच्या भाकरीसोबत वाढावा. सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, कच्चा कांदा आणि शेंगदाण्याची चटणी दिल्यास जेवणाची चव आणखी वाढते. तयार आहे अस्सल मराठमोळा झुणका-भाकरीचा बेत!
Leave a Reply