नाशिक, २२ नोव्हेंबर — दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा आणि गरजू नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणीसाठ्याची सद्यस्थिती व आगामी काळातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना कराव्यात. अन्नधान्य साठवणूक व वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी अंदरसुल येथे उभारण्यात येणारे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदाम महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्याचे बांधकाम निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे १४ कोटी ६० लाख रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या शासकीय धान्य गोदामाचे भूमिपूजन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, उपअभियंता हिमांशू चव्हाण, शाखा अभियंता समरसिंग पाकळ, तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अंदरसुल येथे उभारण्यात येणारे गोदाम अन्नधान्याची सुरक्षित साठवणूक आणि गरजेनुसार वितरण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दुष्काळाच्या काळात अन्नधान्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी अशा पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचविण्यात येत असून, कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. केसरी शिधापत्रिका धारकांनाही अन्नधान्य पुरविण्याबाबत शासनस्तरावर नियोजन सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आगाऊ मदत देण्यात आली असून, पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. संभाव्य सुपर अल निनोच्या प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असून, पुढील वर्षापर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता टिकविण्यासाठी आतापासूनच पाणी व्यवस्थापन करावे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून जलसंधारणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. भुजबळ यांनी केले. दुष्काळ निवारणासाठी शासनाच्या उपाययोजनांबरोबरच लोकसहभागाची आवश्यकता असून, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. चारा टंचाई उद्भवू नये म्हणून चारा लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चारा खरेदी करण्याचेही शासनाचे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन चारा लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
फोटो गॅलरी



Leave a Reply