टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत स्टंपच्या मागून जे काही बोलतो, ते स्टंप माइकवर नोंदवले जाते आणि अनेकदा त्याचे ते बोलणे चर्चेत येते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही पंतने असेच एक मजेशीर विधान केले आणि त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत असताना पंतने ‘इधर से नहीं आयेगा सिंगल, ही इस रेडी टू मिंगल…’ असे म्हटले. त्याचे हे बोलणे ऐकताच जवळ उभ्या असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला हसू आवरले नाही. पंतच्या या स्टंप माइकवरील बोलण्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
किवींची दुसऱ्या डावातील सुरुवात
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने टॉम लॅथमला शून्यावर बाद करत किवी संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर डेव्हन कॉनवे आणि हेनरी निकोल्स यांनी डाव सावरला आणि २० षटकांत संघाची धावसंख्या एक बाद ५९ पर्यंत नेली. मात्र २३ व्या षटकात निकोल्स बाद झाला आणि रचिन रविंद्र फलंदाजीसाठी आला.
रचिन नुकताच फलंदाजीसाठी आला असताना त्याला स्थिर होऊ न देणे महत्त्वाचे होते. त्यामुळे पंतने मागून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केला. डेव्हन कॉन्वेसोबत त्याने मजेशीर स्लेजिंगही केले.
गिल आणि जयस्वाललाही डिवचलं
याच सत्रात पंतने कर्णधार शुभमन गिललाही सोडले नाही. चेंडू टाकल्यानंतर आपण लेग स्पिन गोलंदाजीही करू शकतो, असे तो गिलला म्हणाला. त्यावर गिलने हसत हसत नकार दिला. त्यानंतर पंतने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या यशस्वी जयस्वाललाही डिवचले. काही वेगळी कृती हवी असेल तर जयस्वाल गोलंदाजी करू शकतो, असा टोमणा त्याने मारला.
Leave a Reply