हिवाळा आला की मैदानं आणि व्यायामशाळा पुन्हा गजबजू लागतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी प्रयत्न करू लागतात. मात्र आहारात नेमकं काय घ्यावं, काय खाल्ल्यानं वजन आटोक्यात राहील आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळेल, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यातलाच एक नेहमीचा प्रश्न म्हणजे वजन कमी करण्यासाठी अंडं खावं की पनीर?
अंडं का फायदेशीर ठरतं?
अंडं हे प्रथिनांचा उत्तम स्रोत मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी कॅलरींची तूट महत्त्वाची असते. अशा वेळी कमी कॅलरींमध्ये चांगलं प्रथिनं देणारे आणि पोट भरल्याची जाणीव करून देणारे पदार्थ उपयुक्त ठरतात. उकडलेलं अंडं किंवा कमी तेलात तयार केलेले अंड्याचे पदार्थ दैनंदिन आहारात समाविष्ट करता येतात. मात्र अंडं जास्त तेलात तळून खाल्लं, तर वजन आटोक्यात ठेवणं कठीण होतं. अंड्यासोबत जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणंही टाळावं.
पनीर खाताना काळजी घ्या
अनेक शाकाहारी लोक अंडं खात नाहीत. त्यांच्यासाठी पनीर हा चांगला पर्याय ठरतो. पनीरमध्ये प्रथिनं, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे ऊर्जा टिकून राहते. मात्र पनीरमध्ये चरबी आणि कॅलरींचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं. त्यामुळे पनीर खाताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर वजन कमी करण्याऐवजी लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. पनीर जास्त तेलकट किंवा तुपकट पद्धतीनं न शिजवता तयार करणं फायदेशीर ठरतं.
वजन कमी करणं ही एकाच पदार्थावर अवलंबून असलेली प्रक्रिया नाही. त्यासाठी दररोजचा नियमित आणि योग्य आहार, नियमित व्यायाम, तंतुमय भाजीपाला खाणं, शारीरिक हालचाल आणि संतुलित जीवनशैली आवश्यक आहे. अंडं आणि पनीर योग्य प्रमाणात खाल्ल्यास पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजनही नियंत्रणात राहतं. मात्र कोणत्याही पदार्थाचा अतिरेक टाळणं हेच महत्त्वाचं आहे.
हा लेख केवळ माहितीसाठी आहे. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply