रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत जालन्यात केलेल्या विधानावरून राज्यात राजकीय वाद पेटला आहे. दुष्काळावरून सरकारवर टीका करताना आंबेडकर यांनी अजित पवार यांचा उपरोधिक उल्लेख केला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत आंबेडकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
आंबेडकर काय म्हणाले होते?
राज्यकर्ते पाणी आडवा, पाणी जिरवा असे सांगतात, मात्र जिथे पाऊसच पडत नाही तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचे का, असा उपरोधिक सवाल आंबेडकर यांनी केला होता. भाषणानंतर त्यांनी सारवासारव करताना अजित पवार यांनी यापूर्वी पाण्याबाबत केलेल्या विधानाचाच उपरोधिक उल्लेख केल्याचे स्पष्टीकरण पत्रकारांशी बोलताना दिले.
राष्ट्रवादीकडून निषेध
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध करत ते निंदनीय असल्याचे म्हटले. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही जाहीर निषेध नोंदवला. हयात नसलेल्या व्यक्तीबाबत असे बोलणे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले. आंबेडकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा संविधानिक पद्धतीने त्यांना भेटतील तिथे विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तटकरे यांनी अजित पवार यांचे महाराष्ट्रातील योगदान मोठे असल्याचे सांगत, त्यांच्या अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला होता, असे म्हटले.
Leave a Reply