मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील पन्नास वर्षांच्या पाण्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात जाणारे अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय बैठकीत चर्चिला गेला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना दरवर्षी ६७ टीएमसी नवीन पिण्याचे पाणी मिळू शकेल.
कोयना धरणाचे पाणी कसे वळवणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेले जुने प्रकल्प आणि नवीन पर्याय यांवर सविस्तर चर्चा झाली. चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी सध्या वाशिष्ठी नदीत सोडले जाते आणि ते शेवटी समुद्रात जाते. या पाणीसाठ्याच्या वरच्या भागात कोणताही औद्योगिक प्रकल्प किंवा एमआयडीसी नसल्याने कोयना धरणात येणारे पाणी महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती दिली.
पुढील पाऊल काय?
भुयारी बोगदे आणि पाईपलाईनच्या माध्यमातून हे पाणी मुंबईपर्यंत आणण्याच्या शक्यतेचा आढावा बैठकीत घेण्यात आला. वीजनिर्मितीनंतर वाया जाणारे हे पाणी मुंबईला वळवल्यास शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळेल. सध्या मुंबईला विविध धरणांतून पाणीपुरवठा होत असला तरी भविष्यातील मागणी लक्षात घेता नवीन स्रोताची गरज आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
Leave a Reply