मुंबईत हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्याचबरोबर हवेतील प्रदूषणाची पातळीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी आतापासूनच कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
हिवाळ्यात अनेक ठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोटी पेटवली जाते. तसेच काही ठिकाणी कचरा जाळला जातो. यामुळे हवेत धूर पसरून प्रदूषण वाढते. हे रोखण्यासाठी पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दंड ५०० वरून २ हजार रुपये
यापुढे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना किंवा शेकोटी पेटवून प्रदूषण करणाऱ्यांना २ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. यापूर्वी हा दंड ५०० रुपये होता. त्यामुळे उघड्यावर आग पेटवणे आता चारपट महागात पडणार आहे.
७४ विशेष पथके तैनात
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने बांधकाम व्यावसायिक, कंपन्या, दुकाने आणि नागरिकांसाठी २८ नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी मुंबईत एकूण ७४ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
ही पथके मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये लक्ष ठेवणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस देणे, काम थांबवणे आणि दंड आकारणे अशी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Leave a Reply