मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना पालकांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. रॉकस्टार गेम्सचा बहुचर्चित ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (GTA 6) हा व्हिडिओ गेम १९ नोव्हेंबर रोजी जगभरात अधिकृतरीत्या लॉन्च झाला असून, तरुणांसह लहान मुलांमध्येही या गेमची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र हा गेम मोफत डाऊनलोड करण्याच्या नादात मुले पालकांच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर बनावट लिंक्स उघडत आहेत. यातून सायबर गुन्हेगार पालकांची बँक खाती रिकामी करत असून, मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालकांनी तात्काळ डिजिटल सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे.
गेमचा धोका नेमका काय आहे?
रॉकस्टार गेम्सच्या अधिकृत माहितीनुसार, हा गेम केवळ प्लेस्टेशन ५ आणि एक्सबॉक्स सीरिज एक्स|एस या गेमिंग कन्सोलसाठीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीने अद्याप या गेमचे संगणक (पीसी) किंवा स्मार्टफोन (अँड्रॉइड/आयओएस) व्हर्जन लॉन्च केलेले नाही. तरीही युट्यूब, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर ‘GTA 6 फ्री डाऊनलोड’च्या बनावट लिंक्स आणि एपीके फाईल्स फिरत आहेत. मुले नकळत या लिंक्सवर क्लिक करून बनावट फाईल्स डाऊनलोड करतात, ज्यामुळे पालकांच्या डिव्हाइसमध्ये धोकादायक मालवेअर शिरून यूपीआय, बँक पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती चोरीला जाते.
पालकांनी कराव्यात या ५ डिजिटल सेटिंग्ज
पहिली सेटिंग म्हणजे डिव्हाइसवर ‘पॅरेंटल कंट्रोल’ सुरू करणे. मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना गुगल फॅमिली लिंक या अधिकृत सेवेचा वापर करावा. या सेटिंगमुळे मुले पालकांच्या परवानगीशिवाय प्ले स्टोअरवरून कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करू शकणार नाहीत आणि त्यांचा स्क्रीन टाईमही नियंत्रणात राहील. दुसरी सेटिंग म्हणजे यूपीआय आणि कार्ड पेमेंटला पासवर्ड लॉक ठेवणे. गुगल प्ले स्टोअर किंवा वेब ब्राउझरमध्ये डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती सेव्ह करून ठेवू नये. गुगल प्ले पर्चेस अप्रूव्हल्स सेटिंगमध्ये जाऊन प्रत्येक व्यवहारासाठी बायोमेट्रिक किंवा पासवर्ड बंधनकारक करावा, जेणेकरून गेममधील खरेदीच्या नावाखाली पैसे कापले जाणार नाहीत.
तिसरी सेटिंग म्हणजे थर्ड-पार्टी अॅप्स बंद ठेवणे. अँड्रॉइड फोनच्या सेटिंग्जमधील ‘सिक्युरिटी अँड प्रायव्हसी’ विभागात जाऊन ‘इन्स्टॉल अननोन अॅप्स’ हा पर्याय कायम बंद ठेवावा. यामुळे मुले क्रोम ब्राउझर किंवा व्हॉट्सअॅपवरून आलेली कोणतीही बनावट एपीके फाईल थेट मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकणार नाहीत. चौथी सेटिंग म्हणजे वयोमर्यादा तपासूनच गेम देणे. आंतरराष्ट्रीय गेम मानांकन संस्था पेगी आणि ईएसआरबीने ‘GTA 6’ या गेमला १८+ (पेगी १८ / मॅच्युअर १७+) असे प्रौढ श्रेणीतील मानांकन दिले आहे. या गेममध्ये तीव्र हिंसाचार आणि प्रौढ आशय असल्याने तो लहान मुलांसाठी अजिबात योग्य नाही. त्यामुळे कोणताही गेम देण्यापूर्वी त्याचे एज रेटिंग नक्की तपासावे. पाचवी सेटिंग म्हणजे सुरक्षित ब्राउझिंग सुरू करणे. गुगल क्रोम आणि युट्यूबवर ‘सेफसर्च’ आणि ‘रेस्ट्रिक्टेड मोड’ सुरू ठेवावा. यामुळे मुले इंटरनेटवर धोकादायक किंवा फसव्या गेमिंग वेबसाइट्स शोधू शकणार नाहीत. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.
Leave a Reply