आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल दिसू लागले आहेत. वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि काही वेळा उच्च रक्तदाबाचा त्रासही जाणवू लागतो. सुरुवातीला वाढलेल्या वजनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र पोटावर आणि मांड्यांवर चरबी साचू लागली की दैनंदिन कामांमध्ये अडचणी येऊ लागतात. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
गांधी कुटुंबियांच्या अनेक सवयी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दलही चर्चा सुरू झाली. सोनिया गांधी यांना कबाब, चिकन टिक्का, तंदुरी चिकन, दाल मखणी, काश्मिरी कोफ्ता आणि हाख हे पदार्थ खूप आवडतात. गांधी कुटुंबियांच्या जेवणात तूरडाळ कायम असते. भारतीय स्वयंपाकघरात तूरडाळ आणि मूगडाळीचा वापर नेहमीच केला जातो. या डाळी सहज पचतात आणि शरीरासाठी गुणकारी मानल्या जातात. भारतीय महिलांमध्ये प्रथिनांची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसते, त्यामुळे आहारात तूरडाळीचा समावेश करणे गरजेचे आहे.
प्रथिनांचा चांगला स्रोत
तूरडाळीत लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन यांसारखी आवश्यक अमिनो आम्ले असतात. शाकाहारी आहारात तूरडाळीचे सेवन प्रामुख्याने केले जाते. शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी प्रथिनांची खूप गरज असते. मानवी शरीर स्वतः अमिनो आम्ले तयार करत नाही, त्यामुळे ती आहारातूनच मिळवावी लागतात. शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी तूरडाळ खाणे फायदेशीर ठरते.
हृदय आणि पचनासाठी फायदेशीर
तूरडाळ पूर्णपणे वनस्पतिजन्य असल्यामुळे त्यात कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते. तूरडाळीतील पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तूरडाळीची खिचडी किंवा सूप बनवून त्याचे सेवन करता येते. तूरडाळीत असलेले डायटरी फायबर बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या कमी करण्यास मदत करते. मात्र डाळीतील कर्बोदकांमुळे सुरुवातीला गॅस होऊ शकतो, त्यामुळे शिजवण्याच्या पद्धतीत बदल करणे योग्य ठरते.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply