बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला ‘सखी रिसायकल्स’ हा उपक्रम आता दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला आहे. शेतीतील निरुपयोगी समजले जाणारे अवशेष कलात्मक उत्पादनांमध्ये बदलणाऱ्या या उपक्रमाने दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या ४५ व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमधील ६४ स्टॉल्समध्ये सखी रिसायकल्सचा समावेश आहे.
## मक्याची पाने ते हस्तनिर्मित फुले
अॅड. माधुरी देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात मक्याची वाळलेली पाने, देठ आणि अन्य नैसर्गिक अवशेषांपासून हस्तनिर्मित फुले, पुष्पगुच्छ, सजावटीच्या वस्तू आणि पर्यावरणपूरक भेटवस्तू तयार केल्या जातात. कचरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अवशेषांतून सौंदर्य आणि आर्थिक मूल्य निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
## वाशिम, गोंदिया, बारामती, मुंबईचाही सहभाग
बुलढाण्यासह वाशिम, गोंदिया, बारामती आणि मुंबईतील महिला बचत गटांची उत्पादनेही या मेळ्यात लक्ष वेधून घेत आहेत. वाशिमच्या सुकन्या बचत गटाच्या संघमित्रा हिवराळे यांनी तयार केलेले बेकरी पदार्थ, गोंदियाच्या उईके हस्तकला केंद्राचे प्रतीक उईके यांनी बनवलेल्या होम डेकोर वस्तू आणि पडदे, बारामतीच्या सारिका संतोष शेट्टी यांची चामड्याची उत्पादने, तसेच मुंबईच्या हिना कोरगावकर यांनी तयार केलेले मण्यांचे पर्स, तोरण आणि ज्वेलरी येथे मांडण्यात आली आहेत. या सहभागामुळे कॉर्पोरेट गिफ्टिंग, मोठ्या ऑर्डर्स आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या नव्या संधी खुल्या होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply