अनेकदा आपल्या मोबाईल क्रमांकावर बँक खात्याची केवायसी करण्याचे संदेश येतात. हा संदेश मेसेज बॉक्स किंवा व्हॉट्सॲपवर प्राप्त होतो. अनेकदा या संदेशाची कसलीही खात्री न करता काही ग्राहक पाठवण्यात आलेल्या अनधिकृत लिंकवर टॅप करतात किंवा ॲप डाऊनलोड करतात आणि फसवणुकीचे शिकार होतात. अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे होऊ शकते. बँकेत साठवलेली आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गायब होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक बँक ग्राहकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. बँकेत केवायसी करणे गरजेचे नक्कीच आहे, पण ती केव्हा करावी, कुठे करावी आणि का करावी, याची शहानिशा करून घेणेही तितकेच गरजेचे आहे.
बनावट संदेश कसा ओळखावा?
काही बँक ग्राहकांच्या मोबाईलवर बँक खाते बंद होईल, केवायसी किंवा पॅन प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत संपली आहे किंवा रिवॉर्ड पॉईंट्स संपणार आहेत, असे संदेश येत असतात. मुळात बँक आपल्या ग्राहकांना एखादी प्रक्रिया पूर्ण करवून घेण्यासाठी कधीही भीती दाखवत नाही किंवा लालसा देत नाही. जर बँकेच्या नावाने आलेल्या संदेशात खाते बंद होण्याची भीती दिली जात असेल किंवा पैशांचा लोभ दाखवला जात असेल, तर तो संदेश बनावट असू शकतो. अशा बनावट संदेशांमध्ये अनधिकृत लिंक किंवा ॲपचा समावेश असू शकतो. भीतीपोटी जो ग्राहक या लिंकवर क्लिक करतो किंवा ॲप डाऊनलोड करतो, त्याच्या खात्यातून रक्कम गायब होण्याची भीती वाढते.
बँका आपल्या ग्राहकाकडून कधीही ओटीपी, पिन क्रमांक तसेच सीव्हीव्हीची मागणी करत नाहीत. जर एखाद्या संदेशात या गोष्टींची मागणी करण्यात येत असेल, तर ग्राहकाने वेळीच सावध राहिले पाहिजे, कारण तो संदेश बँक केवायसीच्या नावाने ग्राहकाची लूट करण्यासाठी आला आहे. केवायसी फक्त बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या अधिकृत ॲपच्या माध्यमातूनच पूर्ण करता येते. हल्ली व्हिडिओ केवायसीद्वारेही प्रक्रिया पूर्ण करता येते. यासाठी कोणतेही ॲप डाऊनलोड करावे लागत नाही आणि कोणत्याही अनधिकृत लिंकला भेट द्यावी लागत नाही. जर केवायसी ऑनलाइन करता येत नसेल, तर सुरक्षेसाठी बँकेच्या शाखेत जाऊन ते पूर्ण करणे कधीही योग्य. सध्या देशभरातील बँकांच्या अधिकृत वेबसाईट शेवटी .bank.in ने संपतात, याची नोंद घ्यावी.
चुकीने लिंक उघडली तर काय करावे?
जर एखाद्या ग्राहकाने बनावट संदेशातील लिंक चुकून उघडली किंवा त्यातील ॲप डाऊनलोड झाले, तर अशावेळी थेट १९३० या क्रमांकावर कॉल करावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. जर असा बनावट संदेश प्राप्त झाला असेल, तर त्वरित संबंधित बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. हा संपर्क क्रमांक बँक पासबुकवर मिळून जाईल.
Leave a Reply