पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित पिंपरी चिंचवड करंडक आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लबने विजेतेपद संपादन केले. हरी सावंत याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विन टेंपल क्लबने बजरंग दल संघाचा चार गडी राखून पराभव केला.
हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा खेळणाऱ्या बजरंग दल संघाचा डाव १८.२ षटकात ८३ धावांवर संपुष्टात आला. सुशांत कांबळे यांनी २३ धावा आणि ओंकार यादव यांनी १३ धावा केल्या. विन टेंपल संघाच्या हरी सावंत याने १६ धावांत तीन गडी बाद केले. वेरून चोदरी यानेसुद्धा १८ धावांत तीन गडी बाद केले. राकेश जे. आणि रोहीत चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून बजरंग दलाचा डाव झटपट गुंडाळला.
सावंतची अष्टपैलू कामगिरी
८४ धावांचे लक्ष्य विन टेंपल क्लबने १२.४ षटकात ६ गडी गमावून पूर्ण केले. हरी सावंत याने नाबाद ४३ धावांची खेळी केली. त्याने ३० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय ललित मुसळे यांनी १९ धावा आणि विहान बागड यांनी १४ धावा केल्या. बजरंग दलकडून गणेश कालेल याने ११ धावांत तीन गडी बाद केले. सामनावीर म्हणून हरी सावंत याची निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरण
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे रणजीपटू आणि एमसीएचे माजी सचिव रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीसीएचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, सहसचिव दिलीपसिंह मोहीतेपाटील, स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव, मुकेश गुजराती, प्रशांत तेलंगे आदी उपस्थित होते. जगदीश शेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राजू कोतवाल यांनी प्रास्ताविक, तर संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुकेश गुजराती यांनी सर्वांचे आभार मानले.
विजेत्या विन टेंपल संघाला करंडक आणि २५ हजार रुपये, उपविजेत्या बजरंग दल संघाला करंडक आणि १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या सह्यांद्री किंग्ज् संघाला करंडक आणि पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणेश कालेल, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून यश जाधव, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून हरी सावंत आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारस चव्हाण यांची निवड करण्यात आली.
Leave a Reply