पुणे शहरामध्ये सध्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि महापालिकेकडून अतिक्रमणविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. शहरातील सर्व प्रमुख खाऊगल्ली आणि हॉटेल्सवर कारवाई केली जात आहे. यामध्ये लोकप्रिय हॉटेल्सचाही समावेश आहे. याच मोहिमेत कॅम्प परिसरामध्ये धडक कारवाई करण्यात आली असून, यावेळी २० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आणि आठ हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
स्वच्छतेचे नियम धाब्यावर
हॉटेलमधील स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे एफडीएच्या तपासणीतून समोर आले आहे. कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरातील २० हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता, आठ आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. त्यामुळे या आठही हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत शुक्रवारी (२० नोव्हेंबर) ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली
पुणे स्टेशन परिसरातील मेट्रो रेस्टॉरंट आणि शिवाय कॉर्नर, ईस्ट स्ट्रीटवरील सहाना व्हेज रेस्टॉरंट, कॅम्पमधील ग्रँड दिल्ली दरबार, राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, एम. जी. रोडवरील द बर्गर बार्न कॅफे, ससाणेनगरमधील महादेव फूड्स आणि कोंढवा खुर्द येथील फिरोज केटरर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली. या आस्थापनांच्या स्वयंपाकघरांमध्ये अत्यंत अस्वच्छता आणि मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. सात हॉटेल्समध्ये कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. मेट्रो रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम रंगांसह अतिरिक्त प्रमाणात एमएसजीचा वापर होत असल्याचे आढळले.
कारवाईचे नेतृत्व आणि इशारा
सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके आणि पूजा बागडे यांचा पथकात समावेश होता. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची गय केली जाणार नाही. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीच्या नियमांचे पालन न केल्यास परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील, असा इशारा करकळे यांनी दिला.
Leave a Reply