पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून अनेक दिग्गज नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच भाजपचे नेते उत्पल राय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. उत्पल राय हे बसपा सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे गाझीपूर आणि मऊमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्पल राय हे केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी जुलै २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्षही राहिले आहेत. उत्पल राय हे मऊ जिल्ह्यातील रहिवासी असून, मधुबन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. डॉ. शकुंतला मिश्रा पुनर्वसन विद्यापीठाचे माजी कुलगुरू निशीथ राय यांचे ते धाकटे बंधू आहेत. उत्पल राय यांनी २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली होती.
अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्पल राय यांचे पक्षात स्वागत करत भाजपवर निशाणा साधला. उत्पल राय यांनी कमळ सोडून समाजवादी पक्षाची साथ दिल्याचा टोला अखिलेश यादव यांनी लगावला. यावेळी अखिलेश यादव यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारवर टीका केली. जनता भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केला. अखिलेश यादव म्हणाले, आमच्याकडे निरोप देताना राधे-राधे म्हटलं जातं. यावेळी जनता या सरकारला निरोप देणार आहे. त्यामुळे ही राधे-राधे म्हणत निरोप देण्याची वेळ आहे.
Leave a Reply