शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

साई पल्लवीच्या ‘ओ.एम.’ची सुरुवात; पहिल्या दिवशी ३१ कोटी

'ओ.एम. ऑपरेशन मोल' २० नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी भारतात १७.७० कोटी, तर जगभरात ३१.५५ कोटींची कमाई करत धनुषच्या कारकिर्दीतील मोठं ओपनिंग नोंदवलं.

साई पल्लवीच्या ‘ओ.एम.’ची सुरुवात; पहिल्या दिवशी ३१ कोटी

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावं एकाच चित्रपटात एकत्र आली आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जाणार नाही असं होणं शक्यच नव्हतं. अभिनेता धनुष, मल्याळम सुपरस्टार मम्मूट्टी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ओ.एम. ऑपरेशन मोल’ हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

पहिल्या दिवशी किती कमाई?

चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी १७.७० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली, तर जगभरात पहिल्याच दिवशी ३१.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. भारतातील एकूण ग्रॉस कमाई २०.५५ कोटी रुपये आहे. त्यात तमिळ आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून तिने १३.३५ कोटी रुपये कमावले; तेलुगू आवृत्तीने ४ कोटी, तर हिंदी आवृत्तीने ३५ लाख रुपयांची कमाई केली. परदेशातील बाजारपेठेतून चित्रपटाने ११ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली.

चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटात साई पल्लवी नित्या रेड्डी नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. लाल चंदनच्या तस्करीचा मोठा कट उध्वस्त करण्यासाठी तिच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेत धनुषने साकारलेला ‘पळणी’ हा गुप्तहेर तस्करांच्या टोळीत प्रवेश करतो, तर मम्मूट्टी या तस्करीच्या साम्राज्याचा प्रमुख बर्मा कार्तिकेन यांच्या भूमिकेत दिसत आहे. तामिळनाडूपासून दुबईपर्यंत पसरलेल्या तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश करण्यावर या चित्रपटाची कथा फिरते.

धनुषच्या कारकिर्दीतील सर्वात मोठं ओपनिंग

या कमाईमुळे ‘ओ.एम. ऑपरेशन मोल’ने धनुषच्या आधीच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकले आहेत. ‘रायन’ने पहिल्या दिवशी १३.६५ कोटी, तर ‘कुबेरा’ने १४.७५ कोटी रुपये कमावले होते. ‘तेरे इश्क मे’च्या १६ कोटी रुपयांच्या ओपनिंगलाही या चित्रपटाने मागे टाकलं आहे. त्यामुळे धनुषच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचं सर्वात मोठं ओपनिंग या चित्रपटाला मिळालं आहे. राजकुमार पेरिया स्वामी यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. धनुष, मम्मूट्टी आणि साई पल्लवी यांच्यासोबत श्रीलीला, नसीरुद्दीन शाह, इंद्रन्स यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्याच दिवसाच्या दमदार सुरुवातीनंतर वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance