न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. केएल राहुलचे शतक, देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत यांची अर्धशतकी खेळी या गोष्टी भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणाऱ्या ठरल्या. मात्र कर्णधार शुबमन गिलचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. गिल ९८ धावांवर बाद झाला.
अखेरच्या षटकात गिल बाद
शुबमन गिलची फलंदाजी अतिशय सुरेख सुरू होती. त्याने १४६ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ९८ धावा केल्या होत्या. दिवसातील अखेरच्या षटकात वेगवान गोलंदाज जेकब डफीच्या एका चेंडूने त्याला चकवले आणि गिल क्लीन बोल्ड झाला. शतकापासून तो फक्त दोन धावा दूर होता, त्यामुळे ही गोष्ट भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनाला लागली.
३००० धावांचा ऐतिहासिक टप्पा
शतक हुकले तरी या डावादरम्यान गिलने एक मोठा ऐतिहासिक टप्पा गाठला. तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ३००० धावा पूर्ण केल्या. गिल जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात ३००० धावांचा आकडा गाठणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता अव्वल स्थानी आहे. या सामन्याआधी या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गिलला ८३ धावांची आवश्यकता होती. डावातील ११७ व्या चेंडूवर ८३ वी धाव घेत त्याने हा टप्पा पार केला. गिलने ४३ व्या जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यातील ७७ व्या डावात हा विक्रम नोंदवला.
Leave a Reply