राज्याच्या प्रशासनात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुख्य सचिवपदी असलेले राजेश अग्रवाल ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर नवा चेहरा येणार की अग्रवाल यांनाच मुदतवाढ मिळणार, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अग्रवाल यांना मुख्य सचिवपदावर ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही. त्यामुळे नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीची चर्चा अधिकच जोरात सुरू झाली आहे.
मुदतवाढ मिळणार की नवा चेहरा?
राज्यात दुष्काळाच्या काळात मुख्य सचिवांना मुदतवाढ दिल्याची यापूर्वी अनेक उदाहरणे आहेत. मात्र, सध्याची दुष्काळाची दाहकता आणखी किती महिने राहील, याबाबत कोणतीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे केवळ तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने मुदतवाढीसाठी केंद्राकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, ही बाबही चर्चेत आहे.
तीन नावे चर्चेत
मुख्य सचिवपदासाठी सध्या तीन नावे चर्चेत आहेत. मनीषा म्हैसकर, संजय सेठी आणि मिलिंद म्हैसकर यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. हे तिघेही अधिकारी १९९२ च्या बॅचचे आहेत. ज्येष्ठतेचा विचार केला तर मनीषा म्हैसकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
मनीषा म्हैसकर सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. संजय सेठी यांच्यावर परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे, तर मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे.
संजय सेठी पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत, तर मिलिंद म्हैसकर नोव्हेंबर २०२८ मध्ये निवृत्त होणार आहेत. मनीषा म्हैसकर मार्च २०२९ मध्ये निवृत्त होणार आहेत.
मनीषा म्हैसकर यांना संधी मिळाली तर त्यांना मुख्य सचिवपदावर दोन वर्षे चार महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. संजय सेठी यांना पद मिळाले तर त्यांना दहा महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. मिलिंद म्हैसकर यांना संधी दिली तर त्यांना १४ महिन्यांचा कार्यकाळ मिळू शकतो. मिलिंद म्हैसकर यांच्यानंतर मनीषा म्हैसकर यांना संधी दिली तर त्यांना केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. चार महिन्यांसाठी मुख्य सचिव करणे ही प्रशासनात अन्यायाची भावना मानली जाते. त्यामुळे आता मुख्य सचिवपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply