मराठी चित्रपटसृष्टीची खरी ओळख भव्य सेट किंवा झगमगाटात नाही, तर साध्या गोष्टीतून मोठा आशय मांडण्याच्या ताकदीत आहे. ‘फँड्री’, ‘किल्ला’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ यांसारख्या चित्रपटांनी लहान मुलांच्या नजरेतून समाजाचं वास्तव उलगडलं होतं. त्याच वाटेवर राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी दिग्दर्शित ‘चिकीझिंग’ हा चित्रपट एका चिमुकल्याच्या पावलांमधून दोन वेगवेगळ्या जगांमधील अंतर मोजण्याचा प्रयत्न करतो.
चिक्याची गोष्ट आणि त्याचं स्वप्न
ही गोष्ट आहे चिक्याची. ही भूमिका कृष्णराज वाईंगडे याने साकारली आहे. चिक्या सतत चालत असतो, पळत असतो, धावत असतो. कधी त्याच्या पायात तुटलेली रबरी चप्पल असते, तर कधी झाडाच्या डिंकाने चिकटवलेले काळे बूट. अंगावर अंगापेक्षा मोठा गणवेश. तो थांबत नाही, कारण त्याला कुठेतरी पोहोचायचं आहे. त्याच्या धडपडीमागे नेमकं कोणतं स्वप्न आहे, हे चित्रपट पुढे सरकताना उलगडत जातं.
आपल्या देशात दोन भारत नांदतात, असं उपहासाने म्हटलं जातं — एक ‘भारत’ आणि दुसरा ‘इंडिया’. या दोन जगांच्या मध्ये एक गेट उभं आहे. ‘इंडिया’तली पावलं ‘भारता’त सहज फिरू शकतात; पण ‘भारता’तल्या पावलांना ‘इंडिया’त प्रवेश मिळणं तितकं सोपं नसतं. त्यांना गेटवरच थांबावं लागतं आणि पलीकडचं जग केवळ डोकावून पाहावं लागतं. चिक्याच्या थबकणाऱ्या निरागस पावलांमधून दिग्दर्शकांनी हाच सामाजिक विरोधाभास मांडला आहे. आलिशान निवासी शाळा आणि तिच्याबाहेरचं जग यांच्यातील अंतर केवळ आर्थिक नाही, तर मानसिक आणि सामाजिकही आहे, हे चित्रपट दाखवतो.
कलाकार आणि तांत्रिक बाजू
कृष्णराज वाईंगडे हा चित्रपटाचा सर्वांत मोठा आधार आहे. संपूर्ण चित्रपट चिक्याभोवती फिरतो आणि या बालकलाकाराने ही जबाबदारी सहजपणे पेलली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील कुतूहल, डोळ्यांतील स्वप्नं आणि प्रसंगानुसार बदलणारी देहबोली यामुळे चिक्या केवळ पडद्यावरचं पात्र वाटत नाही, तर आपल्या आसपास वावरणारा एखादा मुलगाच वाटतो. त्याच्या अभिनयात नाटकीपणा जाणवत नाही. त्याच्यासोबत चिक्याची मोठी बहीण तायडी साकारणारी सेजल कोरे हिचं कामही सुंदर आहे. अमृता सुरेश यांनी साकारलेली आई कथेला भावनिक आधार देते.
वैभव कुलकर्णी यांची पटकथा आणि संवाद आशयाच्या दृष्टीने प्रभावी आहेत, तरी प्रसंगांची बांधणी काहीशी विस्कळीत वाटते. मर्यादित बजेटमुळे अनेक घटना केवळ संवादांतून सांगितल्या गेल्या आहेत, त्यामुळे चित्रपटाची दृश्यभाषा काहीशी मर्यादित राहते आणि अनेकदा तो शब्दबंबाळ होतो. ज्या प्रसंगांतून प्रेक्षकांनी स्वतः अर्थ लावायला हवा, तिथे संवादच अधिक स्पष्टीकरण देतात, त्यामुळे कथेचा भावनिक परिणाम म्हणावा तसा पोहोचत नाही. प्रवीण सोनावणे यांचं छायांकन चित्रपटाच्या आशयाला पूरक ठरतं. निसर्गरम्य परिसर, गावातली शाळा आणि आलिशान निवासी शाळेच्या अवकाशातील विरोधाभास त्यांनी चांगल्या प्रकारे टिपला आहे. श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांचं संगीत कथेच्या भावनिक प्रवाहाशी सुसंगत आहे. सुरेश कुंभार यांचं कलादिग्दर्शन आणि वेशभूषा चित्रपटाला वास्तववादी रूप देतात, तर शेखर गुरव आणि एस. शंकर यांचं संकलन कथा प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करतं.
‘चिकीझिंग’ हा परिपूर्ण चित्रपट नाही; त्याच्या पटकथेत, दृश्यात्मक मांडणीत आणि गतीत उणिवा नक्कीच आहेत. सामाजिक विषमतेचा विषय हाताळताना काही प्रसंगांत अधिक खोलवर जाण्याची गरज होती. तरीही, या चित्रपटाचं महत्त्व त्याच्या विषयात आणि तो मांडण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात आहे. बालचित्रपट म्हणजे केवळ मुलांचं मनोरंजन करणारी गोष्ट नव्हे, तर मुलांच्या नजरेतून मोठ्यांना स्वतःचं जग पुन्हा तपासायला लावणारी कलाकृती असते. ‘चिकीझिंग’ नेमका हाच प्रयत्न करतो. चिक्याचे डिंकाने चिकटवलेले बूट, त्याची न थांबणारी पावलं आणि गेटच्या पलीकडच्या जगाकडे पाहणारी त्याची नजर हे चित्रपटाचं बोलकं प्रतीक ठरतं. त्याच्या पावलांना वेग आहे, स्वप्नांना दिशा आहे; पण त्या दिशेने जाण्याचा रस्ता मात्र समाजाने आखून दिलेल्या सीमांनी अडवलेला आहे. चिक्याला गेटच्या पलीकडे पोहोचता येईल का, हा प्रश्न चित्रपटापुरता मर्यादित राहत नाही. तो आपल्या समाजव्यवस्थेलाच विचारलेला प्रश्न ठरतो. या चित्रपटाला तीन तारे मिळाले आहेत. निर्मिती सुप्रिया बगाटे यांची असून कलाकारांमध्ये कृष्णराज वाईंगडे, प्रभाकर मोरे, सेजल कोरे, अमृता सुरेश आणि गायत्री देशपांडे आहेत.
Leave a Reply