बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान कुठलाही शिवसैनिक करणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. खोटेनाटे आरोप करून बदनाम करण्याचे काम विरोधक करत असून विरोधकांकडे खोटं बोलण्यापलीकडे काही नाही, असेही ते म्हणाले.
विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे नेण्याचे काम करतोय. त्यांचा अपमान कुणीही करणार नाही. शायना एनसी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरेसेनेने आरोप केला होता की, सोनिया गांधी यांच्या पुस्तकासोबत बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो फाडण्यात आला.
फाडलेला फोटो बाळासाहेबांचा नसून मणिशंकर अय्यर यांचा होता, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता आणि त्यांना जोडे मारण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते, असे ते म्हणाले. फाडलेल्या फोटोत अय्यर यांचे तोंड फाडलेले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
सावरकरांच्या अपमानावरून शिंदेंचा हल्लाबोल
जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत, त्यांच्याविरोधात उद्धवसेना एकही शब्द काढत नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसने एकही ट्विट केले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घातले जातात, त्याचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले.
राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातही सावरकरांचा अपमान करणारी दोन पाने आहेत. त्यामुळे त्याचा निषेध शिवसेनेने केला, असे शिंदे म्हणाले. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप जे स्वतःला सावरकरवादी, हिंदुत्ववादी म्हणवून घेतात, ते कसे सहन करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशासाठी जे केले ते सर्वश्रुत आहे. त्यांचा अपमान करणे ही कोणती बौद्धिक दिवाळखोरी आहे, असा सवाल शिंदे यांनी केला. ज्या सावरकरांनी देशासाठी हालअपेष्टा सहन केल्या, त्यांचा वारंवार अपमान केला जातो. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना तीन वेळा घरी बसवले गेले. जनतेच्या न्यायालयात जनतेने त्यांना घरी बसवले, अशी टीका शिंदे यांनी काँग्रेसवर केली.
Leave a Reply