शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदाराला थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना ही ऑफर देण्यात आली असून, शिवसेनेत आल्यास मंत्रीपद देण्याचे आश्वासनही गोगावले यांनी दिले आहे.
अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार असून सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत. गोगावले यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गोगावले नेमके काय म्हणाले
जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळी देव उभा राहतो, पण ज्यावेळी देव अडचणीत आला त्यावेळी अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिले, असे मत गोगावले यांनी व्यक्त केले. त्याबद्दल आबा तुम्हाला धन्यवाद, असेही ते म्हणाले. जर आमच्याकडे येण झालं तर मंत्रीपदही देऊ शकतो, हे जमलेल्या जनतेसमोर सांगू शकतो, असे गोगावले म्हणाले.
गोगावले यांच्या या वक्तव्यावर आमदार अभिजीत पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात गर्दी
मंत्री भरत गोगावले हे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल झाले आहेत. मध्यरात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्निक शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे मंत्री आणि आमदार पंढरपुरात दाखल झाले आहेत.
उद्या कार्तिकी एकादशी असून यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत.
Leave a Reply