मुंबई आणि कोकणला लाभलेल्या किनारपट्टीमुळे आता मुंबई ते कोकण, अलिबाग आणि रायगड असा प्रदूषणमुक्त जलप्रवास शक्य होणार आहे. देशातील पहिल्या शंभर टक्के इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल बोटीची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात झाली आहे. डिझेल बोटींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बोटींचा पर्याय चाचपडून पाहिला जात होता, मात्र आता हायड्रोफॉइल तंत्रज्ञानामुळे जलवाहतुकीला नवी गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
स्वीडनमधून आलेली कॅन्डेला पी-१२ बोट
स्वीडनमधून आयात केलेल्या इलेक्ट्रिक कॅन्डेला पी-१२ हायड्रोफॉइल बोटीची चाचणी यशस्वी झाली आहे. महाराष्ट्र सरकार, रुरल एनहान्सर्स ग्रुप आणि साधव शिपयार्ड्स लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि पोर्ट ट्रस्ट यांच्या सहकार्याने सागरी प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी करण्यात आली.
जलवाहतुकीचे मार्ग पुन्हा सक्रिय होण्याची आशा
मुंबईतील गेटवे ते एलिफंटा आणि अलिबाग-मांडवा या मार्गांवर फेरी बोटी सुटतात. मात्र या बोटींची अवस्था नीट नसते आणि डिझेल इंजिनामुळे त्यांचा वेग कमी असतो तसेच प्रदूषणही होते. आता या नव्या बोटीमुळे मुंबईकरांना कोकणात जाता येईलच, शिवाय अलिबाग, एलिफंटा आणि बेलापूरपर्यंतही जाता येणार आहे. देशात सागरी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बोटींचा, म्हणजेच वॉटर टॅक्सींचा वापर कोच्ची येथे यशस्वीपणे केला जातो. मात्र या नव्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानात बोटीचा वेग जास्त असून स्पीड बोटीप्रमाणे ही बोट पाण्यावर तरंगत अंतर कापते. त्यामुळे जलवाहतुकीचे मार्ग पुन्हा सक्रिय होण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतात जागतिक दर्जाचे सागरी तंत्रज्ञान आणण्याचा आणि शाश्वत जलवाहतुकीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Leave a Reply