कोंबड्यांमध्ये पसरणाऱ्या एच५एन१ बर्ड फ्लूमुळे देशातील कुक्कुटपालन व्यवसायाला वारंवार मोठा फटका बसत आला आहे. या विषाणूमुळे लाखो कोंबड्यांचा मृत्यू होतो आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर भारताने कोंबड्यांसाठी बर्ड फ्लूवरील पहिली स्वदेशी लस विकसित केली असून, मंगळवारी भोपाळ येथे या लसीचे अनावरण करण्यात आले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस या संस्थेतील शास्त्रज्ञांनी ही लस तयार केली आहे. या लसीच्या एका डोसची किंमत अवघी एक ते दोन रुपये असणार आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या क्षेत्रातील उद्योजकांना या लसीचा मोठा फायदा होणार आहे.
प्रति डोस एक ते दोन रुपये किंमत असलेली ही लस बर्ड फ्लूच्या या विशिष्ट प्रकारावरील जगातील पहिलीच लस असल्याचे संस्थेतील एका शास्त्रज्ञाने सांगितले. रोगप्रतिबंधक उपाय अधिक प्रभावी करण्यास, लाखो कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यास आणि प्राण्यांच्या रोगांमुळे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यात या लसीचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले.
शास्त्रज्ञांचा सन्मान
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या लसीचे अनावरण करण्यात आले. या संशोधनामागील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा गौरव त्यांनी केला. ज्या ठिकाणी ही लस विकसित झाली, त्याच ठिकाणी शास्त्रज्ञांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
संशोधनात कठोर जैवसुरक्षा
या संशोधनाच्या संपूर्ण कालावधीत शास्त्रज्ञांना अत्यंत कठोर जैवसुरक्षा नियमांचे पालन करावे लागले. प्रयोगशाळेत प्रवेश करण्यापूर्वी आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना विशेष निर्जंतुकीकरण प्रक्रियेतून जावे लागत होते. दररोज अंघोळीसाठी जवळपास १२० लिटर पाण्याचा वापर करावा लागत होता. संशोधन सुरू असताना संशोधकांना त्यांच्या घरी पाळीव प्राणी ठेवण्यासही मनाई करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील नवापूर येथे पहिला उद्रेक
भारतात बर्ड फ्लूचा पहिला उद्रेक २००६ मध्ये महाराष्ट्रातील नवापूर येथे झाला होता. या उद्रेकात जवळपास १० लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक किलोमीटर परिसरातील लाखो पक्ष्यांना मारून त्यांना जमिनीत पुरण्यात आले होते. त्यानंतर भारतात बर्ड फ्लूचे ५०० हून अधिक उद्रेक झाले आहेत. या आजारामुळे २०२१ मध्ये सुमारे नऊ लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला, तर यावर्षी आणखी दोन लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या रोगाचा संसर्ग सस्तन प्राणी आणि मानवांमध्येही होण्याचा धोका असल्याने त्याचे प्रभावी नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
Leave a Reply