आसाममधील गोगामुख येथे २ ऑक्टोबर २०२६ रोजी जन्मलेल्या राजा या सात आठवड्यांच्या आशियाई हत्तीच्या पिल्लाला नवे जीवन देण्यासाठी त्याला विमानाने गुजरातमधील जामनगर येथे नेण्यात आले आहे. जन्माच्या पहिल्याच दिवशी त्याच्या उजव्या मागच्या पायाचे मांडीचे हाड मोडले होते. त्यामुळे त्याला विशेष उपचारांची गरज होती. आता वंतारा येथील विशेष रुग्णालयात त्याच्यावर उपचार होणार आहेत.
जन्मापासूनच संघर्ष
राजाची आई अवघ्या ११ वर्षांची होती. वयाने लहान असल्याने तिला मातृत्वाचा फारसा अनुभव नव्हता. प्रसूतीनंतर ती घाबरलेली आणि अस्वस्थ होती. याच अवस्थेत तिने नवजात पिल्लाला लाथ मारली. त्यामुळे राजाच्या उजव्या मागच्या पायाचे फिमर हे मोठे हाड पूर्णपणे मोडले. सामान्यपणे या वयातील पिल्लू आईच्या शेजारी डगमगत पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते. मात्र राजाला स्वतःच्या पायावर उभे राहणे किंवा पायांवर शरीराचा भार पेलणे शक्य नव्हते. त्याला आईचे पहिले दूध, म्हणजेच कोलोस्ट्रमही मिळू शकले नाही. नवजात पिल्लाची रोगप्रतिकारशक्ती आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी हे पहिले दूध अत्यंत महत्त्वाचे असते.
राजाच्या मालकाने आणि त्याची देखभाल करणाऱ्यांनी त्याला विशेष वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे ओळखले आणि वंताराशी संपर्क साधला. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वंताराचे रॅपिड रिस्पॉन्स पथक राजापर्यंत पोहोचले. एक्स-रे तपासणीत त्याच्या मांडीच्या हाडाचे गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. पथकाने प्लास्टर आणि आधार देणाऱ्या पट्ट्यांच्या मदतीने त्याचा पाय स्थिर केला. जखमी पायावरील ताण कमी करण्यासाठी विशेष स्लिंगचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर राजासाठी विशेष पद्धतीने तयार केलेले दूध सुरू करण्यात आले आणि त्याची काळजी घेणाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
१० ऑक्टोबर रोजी राजाला त्याच्या मालकाच्या पोहुमारा येथील निवासस्थानी हलवण्यात आले. त्यानंतर वंताराचे पथक सातत्याने त्याच्यावर उपचार, देखभाल आणि चोवीस तास देखरेख करत होते.
प्रकृती गंभीर; विमानाने जामनगरला
आईचे दूध न मिळणे आणि मुक्तपणे हालचाल करता न येणे यामुळे राजाला अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रयोगशाळेतील तपासण्यांमध्ये क्लेबसिएला न्यूमोनिया या जीवाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही वारंवार कमी होत होते. रक्त तपासणीत यकृताशी संबंधित घटकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दीर्घकाळ एकाच स्थितीत पडून राहिल्यामुळे त्याच्या डोक्यावर दाबामुळे जखमा झाल्या. याशिवाय त्याला नाभीचा हर्निया आणि सर्वसाधारण अशक्तपणाचाही त्रास जाणवत आहे.
या प्रत्येक समस्येवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकाने अँटिबायोटिक्स, शिरेतून द्रवपदार्थ, यकृतासाठी औषधे, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोबायोटिक्स यांसारख्या विविध उपचारांचा अवलंब केला. मात्र राजाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आता त्याला पूर्णपणे सुसज्ज रुग्णालयातच उपलब्ध होऊ शकणाऱ्या उपचारांची गरज आहे. यामध्ये प्रगत वैद्यकीय तपासण्या, सतत देखरेख, हाडांच्या दुखापतींवरील विशेष उपचार आणि नियोजनबद्ध आहार व पुनर्वसन कार्यक्रमाचा समावेश आहे.
गेल्या सात आठवड्यांपासून वंताराचे पशुवैद्यकीय पथक राजाच्या मालकाच्या घरीच त्याच्यावर उपचार करत होते. मात्र आता त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली आहे की, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्याला सुसज्ज रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक बनले आहे. आसाम ते जामनगर हे २,५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर रस्त्याने पार करणे एवढ्या लहान आणि अशक्त पिल्लासाठी धोकादायक ठरू शकले असते. राजाला काही दिवसांत नव्हे, तर काही तासांत विशेष उपचार मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनंत अंबानी यांनी त्याला सुरक्षितपणे विमानाने हलवण्याची व्यवस्था केली.
भारतात अशा प्रकारे प्राण्याला विमानाने उपचारांसाठी हलवण्याची ही तिसरी घटना आहे. जामनगर येथे पोहोचल्यानंतर राजाला वंताराच्या हत्तींसाठी असलेल्या विशेष रुग्णालयात दाखल केले जाईल. तेथे त्याची सविस्तर तपासणी होऊन वेदना कमी करण्यासाठी उपचार, औषधे, थेरपी आणि पोषणविषयक पुनर्वसन सुरू केले जाईल. त्याच्या दुखापतीचे स्वरूप लक्षात घेता, कदाचित त्याला आयुष्यभर पशुवैद्यकीय उपचार आणि नियमित देखरेखीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. वंताराने त्याची आयुष्यभर काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राजाला जामनगर येथे आणण्याच्या प्रक्रियेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही वैयक्तिक लक्ष घातले. राजाचे मालक भोलानाथ पेगू यांच्या विनंतीनंतर त्यांनी वंताराशी संपर्क साधला आणि या उपचार प्रक्रियेला सहकार्य केले. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या उपक्रमाचे कौतुक केले. राजाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनंत अंबानी आणि वंतारा टीमचे त्यांनी अभिनंदन केले. राजाची तब्येत लवकर बरी होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वंतारामध्ये त्याला पुन्हा उभे राहून दैनंदिन हालचाल करता यावी यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करू, असे वंताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करणी यांनी म्हटले आहे.
Leave a Reply