पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक यांच्या भारतभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण असताना ही भेट होत आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सभ्यता संवाद परिषदेसाठी पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री म्हणून मलिक नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाला होता. त्यानंतर भारतात येणारे मलिक हे पाकिस्तानचे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. या भेटीत त्यांनी दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, असा आशावाद व्यक्त केला.
साडेतीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारतात एन्ट्री
मलिक हे २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत दाखल झाले. पुराना किल्ला येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पहिल्या एससीओ सभ्यता संवाद परिषदेत ते पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. विमानतळावर पाकिस्तान उच्चायोगाचे प्रभारी अधिकारी साद वारैच यांनी त्यांचे स्वागत केले. मे २०२३ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यातील एससीओ बैठकीसाठी आले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा भारतातील हा पहिलाच दौरा असल्याने या भेटीला राजनैतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
पत्रकारांनी संबंध सुधारण्याची शक्यता विचारली असता मलिक यांनी सकारात्मक उत्तर दिले. संपूर्ण प्रदेशात वेगाने बदल होत असून जागतिक राजकारणाची समीकरणेही झपाट्याने बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. आपले सर्व संबंध सुधारतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर व्यापक दृष्टिकोनातून चर्चा करण्याची गरज असल्याचे मलिक म्हणाले. भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि मध्य आशियातील देशांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. सभ्यता संवादाच्या माध्यमातून देशांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढवण्याची चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादाच्या प्रश्नावर मात्र मौन
मात्र, दहशतवादाच्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. सीमापार दहशतवादाबद्दल विचारले असता, उद्या आपले निवेदन दिल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. भारताने सीमापार दहशतवाद थांबवण्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. त्यामुळे केवळ सांस्कृतिक संवादातून संबंध सुधारतील का, हा प्रश्न कायम आहे.
या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे मलिक यांच्या पुढील वक्तव्याकडे आणि परिषदेतील चर्चांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply