जिममध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी आणि आरोग्यवर्धक पूरक आहार वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्सबाबत कठोर नियमावली जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी या नियमांची माहिती दिली.
तरुणांमध्ये जिममध्ये जाऊन शरीरयष्टी बनवण्याची आवड वाढली आहे. त्याचा फायदा घेत अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विक्रीबरोबर कोणताही वैद्यकीय सल्ला दिला जात नाही. त्यामुळे ही उत्पादने घेतल्याने अनेक तरुणांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठीच ही नियमावली तयार करण्यात आली आहे.
परवान्याशिवाय उत्पादन आणि विक्रीवर बंदी
प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या, वजन कमी करणाऱ्या गोळ्या, क्रीडा पूरक आहार आणि हर्बल उत्पादने यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र यातील अनेक उत्पादनांमध्ये मूळ पदार्थ वेगळाच असतो आणि विक्री मात्र वेगळ्या नावाने केली जाते, असा धक्कादायक प्रकार १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईतून समोर आला असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
आता उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, मेडिकल स्टोअर्स, जिम आणि हेल्थ सेंटर्स या सर्वांना ही नियमावली पाळावी लागणार आहे. या सर्वांकडे प्रशासनाचा परवाना असणे आवश्यक आहे. परवान्याशिवाय केलेले कोणतेही काम नियमांचे उल्लंघन मानले जाईल.
सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून वजन कमी करणे, चेहरा उजळवणे किंवा त्वचेवर चमक आणणे यासाठी सोप्या उपायांची माहिती देत अनेकजण खोटे दावे करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. लहान मुले, गर्भवती माता, रुग्ण आणि खेळाडू ही उत्पादने कोणताही विचार न करता घेतात आणि त्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही कडक कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
दंड आणि शिक्षेची तरतूद
नियमावलीचे उल्लंघन केल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परवान्याविना व्यवसाय केल्यासही दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेची शिक्षाही यात ठेवण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply