इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे होर्मुज खाडीचे क्षेत्र सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. या खाडीजवळ एका जहाजावर मोठा हल्ला झाला असून, त्या जहाजावर २४ भारतीय नागरिक होते. या घटनेनंतर भारताने आपली चिंता व्यक्त केली आहे.
या खाडीतून जाणाऱ्या अनेक जहाजांना लक्ष्य केले जात आहे. जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. भारताशी संबंधित नऊ जहाजांवर सध्या विशेष नजर ठेवली जात आहे.
सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले
केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भारतीय जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती पावले उचलण्यावर चर्चा झाली. समुद्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
संवेदनशील भागांवर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे. सुरक्षेसंबंधी इशारे आणि सूचना जहाजांपर्यंत लवकर पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील. शिपिंग कंपन्या आणि जहाजांच्या मालकांशी अधिक संपर्क ठेवला जाणार आहे. भारतीय खलाशांची सुरक्षा आणि बचावकार्यावरही भर दिला जाईल.
भारताची भूमिका आणि खाडीचे महत्त्व
व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात भारताने भूमिका घेतली असून त्यावर टीका केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांना लक्ष्य केले जात असल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि समुद्र क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच जागतिक संस्थांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या काळात होर्मुज खाडीतून ८६ जहाजे गेली आहेत. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मागील काही दिवसांपासून हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. भारतात येणारे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरवठा होर्मुज खाडीतून होतो, त्यामुळे या खाडीतील सुरक्षा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Leave a Reply