शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहेत. शिंदे कधी आणि कोणता धक्का देऊन सर्वांना बुचकाळ्यात टाकतील, याचा नेम नसतो. त्यामुळेच शिंदे यांच्या प्रत्येक चालींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असते. परकीयांसोबतच नव्हे, तर स्वकियांसोबतही शिंदे यांनी धक्कातंत्र वापरल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. आता ठाण्यातील स्वपक्षातील नगरसेवकांनाही याचा प्रत्यय आला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत त्यांनी अत्यंत बोल्ड निर्णय घेतला असून, त्यामुळे ठाण्यात सध्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
जुन्या नगरसेवकांना डावलले
ठाणे महापालिकेत स्थायी समितीवर काही सदस्यांची नियुक्ती करायची होती. त्यासाठी काही जुने आणि मातब्बर नगरसेवकांची नावे चर्चेत होती. या नगरसेवकांनी स्थायी समितीवर जाता यावे म्हणून मोठा जॅक लावला होता आणि लॉबिंगही सुरू केली होती. मात्र शिंदे यांच्या एका निर्णयापुढे कुणाचीच डाळ शिजली नाही. सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, राम रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी, विमल भोईर, संजय भोईर आदींची नावे स्थायी समिती सदस्यपदासाठी चर्चेत होती. मात्र त्यांना पहिल्या वर्षी संधी नाकारण्यात आली आहे. यापैकी अनेकजण स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीत होते. तर पूर्णेकर प्रकरणामुळे मीनाक्षी शिंदे यांना देखील संधी नाकारल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी
एकनाथ शिंदे यांनी दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी आदी सदस्यांना संधी दिली आहे. ज्यांची नावे सदस्यपदासाठी आणि सभापतीपदासाठी चर्चेत नव्हती, त्यांना शिंदे यांनी संधी दिली आहे. आता यापैकी कुणाच्या गळ्यात स्थायी समिती सभापती पदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने स्थायी समिती सदस्यपदासाठी भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, कमल चौधरी यांची, तर शरद पवार गटाने पल्लवी जगताप, यासीन कुरेशी यांची नियुक्ती केली आहे. अजितदादा गटाने सुहास देसाई, तर एमआयएमने शोएब डोंगरे यांची नियुक्ती केली आहे. स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची नावे करण्यात येणार आहेत.
Leave a Reply