वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण त्यामध्ये कार्तिकी एकादशीला वेगळे स्थान आहे. या दिवशी भाविक विठुरायाच्या नावाचा गजर करत उपवास करतात. काही भाविक पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात, तर काहीजण घरीच पूजा, भजन आणि कीर्तन करून हा दिवस साजरा करतात.
उपवासाचे पुण्यफल काय?
धार्मिक मान्यतेनुसार कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा आणि उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते. पद्मपुराणातील प्रबोधिनी एकादशीच्या महात्म्यात या व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे. श्रद्धेने उपवास करणाऱ्या भक्ताला हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञ केल्याइतके पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या एकादशीला केवळ उपवासाचा दिवस न मानता भक्ती, संयम आणि पुण्यप्राप्तीचा दिवस मानले जाते.
उपवास कसा करावा?
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू आणि विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करावी. देवाला फुले, तुळशीपत्रे, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा आणि शक्य असल्यास सहस्रनाम, हरिपाठ किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. दिवसभर उपवास करून भजन-कीर्तन आणि हरिनामात वेळ घालवावा.
उपवास करताना काही भाविक निर्जळी व्रत करतात, तर काहीजण फळे, दूध, साबुदाणा आणि राजगिरा यांसारखे फराळाचे पदार्थ खातात. दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणा करण्याची परंपरा आहे.
पितरांचा उद्धार आणि चातुर्मासाची सांगता
पितरांच्या उद्धारासाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण आणि पूजा केली जाते. भजन करून रात्र जागरण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तीभावाने जागरण आणि विष्णू कथा श्रवण केल्याने पुण्य मिळते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या पितरांचाही उद्धार होतो, अशी श्रद्धा आहे.
कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला चार महिन्यांनंतर ते जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवसापासून चातुर्मासाची सांगता होते आणि त्यानंतर विवाह व इतर शुभकार्यांना सुरुवात होते.
Leave a Reply