काही गाणी ठरवून बनत नाहीत; ती आपले वेगळेच नशीब घेऊन येतात. मराठी सिनेसृष्टीतील जुनी गाणी मनात घर करून राहणारी ठरतात. असेच एक गाणे आहे पिंजरा चित्रपटातील सदाबहार गाणे, ज्याच्या रचनेची कथा अत्यंत रंजक आहे.
व्ही. शांताराम यांचा पिंजरा सिनेमा ३१ मार्च १९७२ रोजी प्रदर्शित झाला. त्याला आता ५४ वर्षे उलटूनही सिनेमातली गीते मनाच्या कप्प्यात घर करून आहेत. या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. या चित्रपटातील गाणी अनेक गायकांनी गायली आहेत. या चित्रपटासाठी ११० गाणी लिहिण्यात आली. त्यापैकी ११ गाणी चित्रपटात घेतली गेली.
कोरसमधील गायकाला मिळालेले गाणे
या ११ गाण्यांपैकी एक गाणे म्हणजे ‘गं… साजणी कुण्या गावाची, कुण्या नावाची, कुण्या राज्याची तू गं राणी…’ हे गाणे मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हे गाणे कोरसमधील गायकाला दिले गेले. ते गायक होते विष्णू गायकवाड.
एका लकेरीतून जन्मलेले गाणे
हे गाणे ठरवून नाही तर एका लकेरीतून बनले. संगीतकार राम कदम एकापाठोपाठ एक धून गात होते. ही त्यातील लकेर व्ही. शांताराम यांच्या कानावर पडली. त्यांनी लगेच जगदीश खेबुडकर यांना या लकेरीवर गाणे लिहायला सांगितले.
व्ही. शांताराम म्हणाले, ‘हे गाणे तमाशाच्या फडाचे संपूर्ण जग उभे करेल असे तयार करा.’ नंतर खेबुडकरांनी शब्दांची छडी फिरवली आणि जन्माला आले सुपरहिट गाणे. आजही हे गाणे ऐकताना तमाशाच्या फडाचे ते जग डोळ्यांसमोर उभे राहते.
Leave a Reply