महाराष्ट्राच्या विविध भागांतील भाषा आणि बोली यामुळे आपली मायबोली अधिक समृद्ध होते, याचे एक सुंदर उदाहरण ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहायला मिळाले. खानदेशातील अहिराणी भाषेचा ठसका या लोकप्रिय कार्यक्रमात उमटला आणि त्यामागे होती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका वैशाली नांद्रे यांची प्रेमळ विनंती.
वैशाली नांद्रे या प्राथमिक शाळेत शिकवतात. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी अहिराणी, बंजारा आणि मराठी अशा विविध भाषा बोलतात. कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आणि आपल्या विद्यार्थ्यांशी अहिराणी भाषेत बोलण्याचा आग्रह धरला. खानदेशात अहिराणी भाषा प्रामुख्याने बोलली जाते आणि तिचा लहेजा वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिराणी भाषेचा आग्रह
वैशाली यांच्या विनंतीला प्रतिसाद देत माधुरी दीक्षित यांनी अहिराणी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. ‘शिकीन, चांगलं मोठ्ठ माणूस बना’, असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माधुरीच्या तोंडून अहिराणी ऐकून वैशाली आनंदित झाल्या आणि ‘आमची अहिराणी आपल्या तोंडून छान वाटते’, असे त्या म्हणाल्या.
माधुरी यांचे कौतुक करताना वैशाली म्हणाल्या की, खेळ बदलला आहे असे म्हटले जात असताना एक स्त्री सूत्रसंचालन करू शकते आणि हा खेळ इतक्या सुंदर पद्धतीने पुढे नेऊ शकते, याचा त्यांना अभिमान आहे. कसदार अभिनय, बहारदार नृत्य आणि जन्मजात सौंदर्य यांचा मिलाफ माधुरी यांना त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर घेऊन गेला आहे, असेही त्या म्हणाल्या. एक महाराष्ट्रीय मुलगी आदर्श मुलगी, आदर्श आई आणि आदर्श अभिनेत्री होऊ शकते, याचे माधुरी हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे वैशाली यांनी नमूद केले.
स्पर्धकांच्या प्रवासातून प्रेरणा
या कौतुकाला उत्तर देताना माधुरी यांनी नम्रतेने सांगितले की, स्पर्धकांच्या आयुष्यातून त्यांनाही प्रेरणा मिळते. कार्यक्रमात येणारे स्पर्धक आपले जीवन आणि संघर्ष सांगतात, त्यातून आपण प्रेरित होतो, असे माधुरी म्हणाल्या. त्यांच्या या उत्तरावर वैशाली यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित केला.
वैशाली यांनी सांगितले की, धुळ्यातील स्पर्धकही यापूर्वी या कार्यक्रमात येऊन गेले आहेत. प्रत्येक सामान्य स्पर्धकाच्या जवळ जाऊन त्याला समजून घेणे, प्रत्येक स्त्रीला समजून घेणे आणि प्रत्येकाचे वेगळे क्षेत्र असूनही त्याविषयी छान पद्धतीने जाणून घेणे, हा माधुरी यांच्या स्वभावातील सुंदर पैलू असल्याचे त्यांनी म्हटले. या संवादातून मंचावर केवळ ज्ञान आणि मनोरंजनच नव्हे, तर प्रादेशिक भाषांचा अभिमान आणि माणसांमधील आपुलकीही अनुभवायला मिळाली.
हा विशेष भाग शुक्रवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव्ह या ओटीटी मंचावर पाहता येणार आहे.
Leave a Reply