आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झलक दाखवण्यात आली आहे. मात्र, चित्रपटात दाखवण्यात आलेला दाऊद आणि प्रत्यक्षातील दाऊद यांच्यात मोठा फरक असल्याचा दावा अमेरिकेच्या तपास यंत्रणेतील माजी एफबीआय ऑपरेटिव्ह कामरान फरीदी यांनी केला आहे.
‘धुरंधर’मध्ये दाऊदला आजारी, वृद्ध आणि असहाय्य अवस्थेत दाखवण्यात आले आहे. चित्रपटात अभिनेता दानिश इक्बाल याने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली असून, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाऊदला ‘बडे साहब’ या नावाने दाखवण्यात आले आहे. चित्रपटात तो वृद्ध आणि आजारी असून अंथरुणाला खिळल्याचे पाहायला मिळते. मात्र, कामरान फरीदी यांच्या दाव्यानुसार, दाऊदची प्रत्यक्षातील परिस्थिती यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तो आजही आपल्या गुन्हेगारी नेटवर्कवर नियंत्रण ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
कामरान फरीदी यांनी ‘आज तक रेडिओ’च्या ‘क्राइम ब्रांच’ पॉडकास्टमध्ये होस्ट अरविंद ओझा यांच्याशी संवाद साधताना हे दावे केले आहेत.
पाकिस्तानातील ठिकाणे आणि सुरक्षेचा दावा
दाऊद सध्या पाकिस्तानातच राहत असल्याचा दावा कामरान यांनी केला आहे. पाकिस्तानात त्याची तीन गुप्त ठिकाणे असून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला की तो आपले ठिकाण बदलतो, असेही त्यांनी सांगितले. दाऊदच्या सुरक्षेची जबाबदारी छोटा शकील सांभाळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दाऊदच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती छोटा शकील दर शुक्रवारी पाकिस्तानच्या आयएसआय मुख्यालयात देत असल्याचेही कामरान यांनी म्हटले आहे.
खासगी आयुष्याबाबतही धक्कादायक दावे
कामरान यांनी दाऊदच्या खासगी आयुष्याबाबतही काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दाऊदने स्वतःपेक्षा वयानं खूप लहान असलेल्या तरुणीशी दुसरे लग्न केले आहे. इतकेच नाही, तर दाऊद कोकेनच्या आहारी गेल्याचाही दावा त्यांनी केला आहे. दाऊद आणि त्याची डी-कंपनी भारत तसेच पाकिस्तानमध्ये अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचेही कामरान यांनी म्हटले आहे.
कामरान यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये काम करत असताना त्यांची दाऊदशी अनेकदा भेट झाली होती. इतकेच नाही, तर ते दाऊदसोबत अनेक पार्ट्यांमध्येही सहभागी झाले होते. दाऊद स्वतःला धार्मिक व्यक्ती म्हणून दाखवत असला, तरी प्रत्यक्षात त्याला आलिशान जीवनशैली जगण्याची सवय झाली आहे, असे कामरान यांनी सांगितले.
Leave a Reply