मुंबईत बहुविवाहाच्या विरोधात मुस्लिम महिलांचा आवाज अधिक तीव्र होत आहे. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संघटनेने या प्रश्नावर विशेष जनसुनावणी घेण्याची तयारी केली आहे. या सुनावणीत देशभरातील सहा राज्यांतील पीडित महिला आपले अनुभव तज्ज्ञांच्या पॅनेलसमोर मांडणार आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम ८२ ची अंमलबजावणी मुस्लिम महिलांसाठीही व्हावी, अशी या संघटनेची प्रमुख मागणी आहे. या तरतुदीमुळे बहुविवाहाच्या प्रथेला कायदेशीर आळा बसेल, असा युक्तिवाद संघटनेकडून करण्यात येत आहे.
सहा राज्यांतील महिला मांडणार व्यथा
या जनसुनावणीत महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली आणि ओडिशा या सहा राज्यांतील महिला सहभागी होणार आहेत. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे त्यांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कोणते परिणाम झाले, याची माहिती त्या देणार आहेत. या प्रथेचा त्यांच्या मुलांच्या भविष्यावर आणि शिक्षणावरही वाईट परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाड, पत्रकार ज्योती पुनवानी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शम्सुद्दीन तांबोली, फिरोज मिठीबोरवाला, झीनत शौकत अली, काझी मेहताब हुसैनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पॅनेलसमोर ही सुनावणी होणार आहे.
दोन वर्षांचा अभ्यास, २५०० महिलांचा अहवाल
ही संघटना गेल्या दोन वर्षांपासून बहुविवाहाने पीडित महिलांचे हक्क, अधिकार आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासंबंधी अभ्यास करत आहे. बहुविवाहाला बळी पडलेल्या २५०० महिलांशी संघटनेने सखोल संवाद साधला असून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. पीडित महिलांच्या माहेरकडील लोकांची बाजूही ऐकून घेण्यात आली आहे. याविषयीचा एक अहवालही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अहवाल सरकारसमोर ठेवून पीडितांच्या अडचणींविरोधात आवाज उठवण्यात येणार आहे.
कलम ८२ मध्ये काय आहे?
भारतीय न्याय संहितेच्या कलम ८२ मध्ये पहिला जोडीदार हयात असताना दुसरे लग्न करण्याच्या गुन्ह्याची तरतूद आहे. पूर्वीच्या भारतीय दंड संहितेतील कलम ४९४ आणि ४९५ यांच्याशी हे कलम संबंधित आहे. पहिली पत्नी अथवा पती जिवंत असताना दुसरे लग्न केल्यास दोषी व्यक्तीला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. जोडीदाराला लपवून दुसरे लग्न केल्यासही तो गुन्हा ठरतो. सध्या ही तरतूद हिंदू धर्मीयांना लागू आहे. मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत काही अटींसह पुरुषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याची मुभा आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांनाही हिंदू स्त्रियांप्रमाणेच हा अधिकार मिळावा, अशी मागणी या जनसुनावणीतून पुढे येत आहे.
Leave a Reply