जगभरात राजकीय घडामोडी वेगाने वाढत असताना चीनच्या शेन्झेनमध्ये तीन शक्तिशाली नेते एकाच कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या तिघांची या कार्यक्रमात उपस्थिती असणार आहे. या नेत्यांमध्ये युद्ध, आर्थिक अनिश्चितता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती समोर आली आहे.
या बैठकीकडे जगभराचे लक्ष लागले आहे. या बैठकीची तुलना १९४५ सालच्या याल्टा परिषदेशी केली जात आहे. याल्टा परिषदेत दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत संघाचे नेते एकत्र आले होते.
याल्टा परिषदेत काय घडले होते?
फेब्रुवारी १९४५ मध्ये याल्टा परिषद झाली होती. क्रिमियाच्या याल्टा शहरात ४ ते ११ फेब्रुवारी १९४५ या काळात ही परिषद पार पडली. त्यावेळी दुसरे महायुद्ध अंतिम टप्प्यात होते, मात्र जर्मनीचा पराभव आणि जपानविरुद्धच्या युद्धाचा शेवट अजून बाकी होता. या परिषदेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट, ब्रिटनचे पंतप्रधान विंस्टन चर्चिल आणि सोव्हिएत संघाचे नेते जोसेफ स्टॅलिन सहभागी झाले होते.
परिषदेत नाझी जर्मनीची विभागणी, युरोपची राजकीय व्यवस्था आणि संयुक्त राष्ट्राची स्थापना या मुद्द्यांवर चर्चा झाली. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर तेथे शासन कसे चालेल, युरोपच्या राजकीय सीमा कशा असतील, सत्तावाटप कसे होईल आणि जपानविरुद्धच्या युद्धात सोव्हिएत संघाची भूमिका काय असेल, यावरही विचारमंथन झाले. भांडवलशाही आणि साम्यवाद या विषयांवरही चर्चा झाली होती.
८१ वर्षांनंतर पुन्हा तीन शक्तिशाली नेते एकत्र
याल्टामध्ये सोव्हिएत संघाला पूर्व युरोपमध्ये वर्चस्व राखण्याची संधी मिळाली. पोलंडमध्ये नव्या सरकारमध्ये डाव्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. जर्मनीचे भविष्य आणि त्यावर वर्चस्व मिळवण्याबाबत निर्णय झाला. संयुक्त राष्ट्रांच्या निर्मिती आणि सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यांच्या नकाराधिकारावरही करार झाला. जपानविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्याच्या बदल्यात सोव्हिएत संघाला आशियामध्ये काही सवलती देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला.
ही केवळ तीन नेत्यांची बैठक नव्हती. या बैठकीने युद्धानंतरच्या जागतिक व्यवस्थेचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता ८१ वर्षांनंतर पुन्हा तीन प्रमुख देशांचे नेते एकत्र येत असल्याने ही भेट जगाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Leave a Reply