गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने, बनावट मद्य आणि गुटखा रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यासह सोशल मीडियावरून होणाऱ्या बदनामीकारक आरोपांप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून क्यूमाईन क्लबजवळ बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
मध्यस्थीची बैठक निष्फळ
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेली मध्यस्थीची बैठक निष्फळ ठरल्याने महापौरांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. महापौरांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी येनपुरे यांनी बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात महापौरांना चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीला आमदार अनुप अग्रवाल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते. येनपुरे यांनी महापौरांच्या मागणीनुसार सर्व कायदेशीर कारवाई करण्याचे आणि तसे लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिले. मात्र, उपोषण केले नाही तर जनतेत चुकीचा संदेश जाईल आणि गैरसमज निर्माण होतील, अशी ठाम भूमिका महापौरांनी मांडली.
पंधरवड्यापासून शहरात गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने, प्रतिबंधित गुटखा आणि बनावट मद्यविक्री या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर सत्ताधारी भाजप नेते आणि गोरक्षक, काही विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक संघर्ष सुरू आहे. यातील निराधार आरोपांमुळे नाहक बदनामी होत असल्याने महापौर परदेशी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन देऊन चार दिवसांत कारवाईचा लेखी अहवाल मागितला होता. अन्यथा उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
राजीनामा देण्याचीही तयारी
चर्चा निष्फळ ठरल्याने महापौर ठरल्याप्रमाणे गुरुवारपासून उपोषण सुरू करणार असल्याची माहिती त्यांचे पती तथा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनी दिली. कथित गोरक्षक आणि काही विरोधकांकडून सोशल मीडियावर केले जाणारे आरोप तथ्यहीन आहेत. कायदा सर्वांसाठी समान असून, दोषी कोणत्याही पदाचा किंवा पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. प्रसंगी महापौरपदाचा राजीनामा देईन, पण निराधार आरोप सहन करणार नाही. जोपर्यंत दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहीन, अशी भूमिका महापौर परदेशी यांनी स्पष्ट केली.
महापालिकेचीही कारवाई
महापौरांच्या उपोषणापूर्वीच महापालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीशी संबंधित सील असलेली तीन दुकानेवजा केंद्रे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत गुरुवारी जमीनदोस्त करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्या आस्थापनांना पंधरा दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली असून, महापौरांचे उपोषण सुरू होताच ही मोहीम राबवली जाणार आहे.
Leave a Reply