आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी खेळाडू कायम ठेवण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी पार पडली. यात दहा संघांनी आपापल्या खेळाडूंबाबत निर्णय जाहीर केले. यामध्ये सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्याबाबतही मोठा निर्णय झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने अर्जुनला आगामी हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा लखनऊच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
अर्जुनला संघात कायम ठेवल्यानंतर लखनऊने समाजमाध्यमांवर खास पोस्ट शेअर केली. अर्जुनच्या छायाचित्रासोबत संघाने मेहनत आणि निशाणा याबद्दलचे खास वाक्य लिहिले. या पोस्टमधून संघाने अर्जुनवरील विश्वास व्यक्त केला आहे.
अर्जुनचा आतापर्यंतचा प्रवास
अर्जुन तेंडुलकर २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला होता. तेव्हा संघाने त्याला २० लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला २०२३ पर्यंत वाट पाहावी लागली. २०२५ पर्यंत तो मुंबईच्या संघाचा भाग होता. आयपीएल २०२६ पूर्वी मुंबई इंडियन्सने अर्जुनला ३० लाख रुपयांच्या ऑल-कॅश कराराद्वारे लखनऊ सुपर जायंट्सकडे पाठवले होते. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने सहा सामने खेळले असून चार विकेट घेतल्या आहेत आणि १८ धावा केल्या आहेत. २०२६ च्या हंगामात लखनऊकडून त्याला केवळ एका सामन्यात संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली आणि पाच धावा केल्या.
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमध्येही अर्जुनची कामगिरी लक्षवेधी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २४ सामन्यांत त्याने ५२ विकेट आणि ६८५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये २४ सामन्यांत २६ विकेट आणि १६० धावा, तर टी-२० क्रिकेटमध्ये ३० सामन्यांत ३६ विकेट आणि १९४ धावा अशी त्याची कामगिरी आहे. विशेष म्हणजे आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी लखनऊकडे ४७.४५ कोटी रुपयांची सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. एवढी रक्कम असतानाही संघाने अर्जुनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा अर्जुनला किती सामने खेळायला मिळतात आणि त्यामध्ये त्याची कामगिरी कशी राहते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
Leave a Reply