तळोजा येथील रिफायनरीतून जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनरमधून दुबईला पाठवण्यात येणाऱ्या महागड्या पेट्रोलियम जेलीची चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. कंटेनरमधून पाइपच्या साहाय्याने सुमारे ४०० लिटर पेट्रोलियम जेली काढून महिंद्रा पिकअप व्हॅनमध्ये ठेवलेल्या बॅरलमध्ये भरली जात होती. जप्त करण्यात आलेल्या जेलीची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी कंटेनर, पिकअप व्हॅन आणि ट्रेलरसह एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या सहा जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री छापा
एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पुनीत कॉर्नर येथील पार्किंगमध्ये एका कंटेनरमधून पेट्रोलियम पदार्थ काढला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी कंटेनरमधून पाइपच्या साहाय्याने पेट्रोलियम जेली काढून ती पिकअप व्हॅनमधील बॅरलमध्ये भरली जात असल्याचे आढळून आले.
पुढील तपास सुरू
तपासादरम्यान हा कंटेनर तळोजा येथील गांधार ऑइल रिफायनरीमधून आला असून, जेएनपीटीमार्गे तो दुबईला पाठवण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. कंटेनरमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचा माल होता. चोरी केलेली जेली कुठे विकली जाणार होती आणि या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
Leave a Reply