जळगाव शहरातील नाट्यरसिकांना येत्या रविवारपासून दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी मिळणार आहे. शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील महाकवी कालिदास सभागृहात २२ नोव्हेंबरपासून ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी सात वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ६५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला असून, या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
१५ नाट्यसंस्था सहभागी
या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार व इंदूर जिल्ह्यातील एकूण १५ नाट्यसंस्था प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत.
रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे. या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
Leave a Reply