धारावी येथे गुरू नानक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळीनिमित्त स्नेहमेळावा साजरा केला. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शांतिवन कुष्ठरोग निवारण समिती येथे हा उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसोबत आनंदाचे क्षण घालवत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रत्यय दिला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, त्यांच्याशी संवाद साधणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहानुभूती आणि मानवतेची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
फराळ, भेटवस्तू आणि खेळांचे आयोजन
यानिमित्त विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाची आकर्षक सजावट करून उत्सवी वातावरण निर्माण केले. आजी-आजोबांना फराळ, मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या भेटींमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आजी-आजोबांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठांना विरंगुळ्यासोबतच आनंदाचे क्षण अनुभवता आले.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. सुमीत खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारी आणि माणुसकीची जाणीव निर्माण करणे होय, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आनंद वाटल्याने वाढतो आणि माणुसकीतूनच समाजाची खरी समृद्धी घडते, ही भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली.
Leave a Reply