अजिंठा-वेरूळचा जागतिक वारसा आणि वेगाने विकसित होणारे ऑरिक औद्योगिक क्षेत्र यामुळे देश-विदेशाचे लक्ष वेधणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाची क्षमता मोठी आहे. मात्र प्रत्यक्ष हवाई वाहतूक मर्यादित आहे. विमानतळावर २४ तासांत ७२ विमाने उतरू शकतात, पण प्रत्यक्षात अवघी पाच विमाने येत आहेत. मुंबई, नवी मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळूर या पाच शहरांपुरताच हवाई संपर्क सुरू आहे.
सेवा कमी होत आहेत
नवीन शहरांना जोडण्याऐवजी सुरू असलेल्या विमानफेऱ्याही कमी होत आहेत. अहमदाबाद आणि गोवा या सुरू असलेल्या सेवाही संपुष्टात आल्या आहेत. कोरोनापूर्वी १६ विमाने असलेली सेवा आता सहा विमानांवर आली आहे. त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि व्यावसायिक प्रवाशांची कोंडी होत आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि छत्रपती संभाजीनगर फर्स्टसह विविध संघटनांकडून विविध मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची वारंवार मागणी होत आहे.
सुविधा असूनही पुढाकार नाही
विमानतळावर धावपट्टी, अद्ययावत टर्मिनल आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही विमान कंपन्यांकडून नवीन मार्ग सुरू करण्यासाठी अपेक्षित पुढाकार घेतला जात नाही. पूर्वी सुरू असलेल्या काही सेवा बंद झाल्या, तर काही मार्गांवरील फेऱ्यांची संख्या घटली आहे. परिणामी प्रवाशांना मुंबई, पुणे किंवा शिर्डीमार्गे पुढील प्रवास करावा लागत असून वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. सकाळी सहा ते रात्री आठ ते दहा या वेळेत दिवसाला ४० विमाने ये-जा करू शकतात, अशी क्षमता विमानतळाकडे असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांनी सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय सेवेची प्रतीक्षा
विमानतळाला आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ऑरिक शेंद्रा आणि बिडकीनमध्ये परदेशी कंपन्यांचे प्रकल्प कार्यरत असून भविष्यात आणखी गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक असलेले इमिग्रेशन काउंटर आणि संबंधित यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ही सुविधा सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. जपानसह आखाती देशांशी थेट संपर्क प्रस्थापित झाल्यास वाहन, औषधनिर्मिती आणि अन्य उद्योगांतील निर्यातदार, गुंतवणूकदार तसेच पर्यटकांना मोठा फायदा होईल.
पर्यटन क्षमता मोठी, सेवा तोकडी
अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ला या ऐतिहासिक स्थळांना देश-विदेशातून पर्यटक भेट देतात. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रमुख पाच पर्यटनस्थळांवर ४२ लाखांहून अधिक देशांतर्गत पर्यटक भेटी आणि ५१ हजारांहून अधिक परदेशी पर्यटक भेटींची नोंद झाली. साधारण ३५ हजारांपर्यंत विदेशी नागरिक विविध कारणांनी शहरात येतात. एवढी मोठी पर्यटन क्षमता असतानाही देशातील प्रमुख पर्यटन शहरांशी थेट विमानसेवा मर्यादित आहे. हवाई संपर्क वाढवण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज असल्याचे मत पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
प्रवासी वाढले, विस्ताराचे आव्हान कायम
२०२२-२३ मध्ये ४ लाख ६८ हजार ४८६ प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला होता. ही संख्या २०२३-२४ मध्ये ६ लाख २३ हजार ९१५ वर, तर २०२४-२५ मध्ये सुमारे सात लाखांवर पोहोचली. तीन वर्षांत प्रवासी संख्येत सुमारे ४९.४ टक्के वाढ झाली आहे. मात्र वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत विमानसेवांचा विस्तार करण्याचे आव्हान कायम आहे. थेट हवाई संपर्क वाढल्यास पर्यटकांचा प्रवास सुलभ होण्यासोबतच स्थानिक हॉटेल, वाहतूक, मार्गदर्शक आणि हस्तकला व्यवसायालाही चालना मिळू शकते.
दहा वर्षांत विमानतळाला ४४७.८३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२४-२५ या दहा वर्षांत झालेल्या या तोट्यामुळे देशातील २०२४-२५ मध्ये तोट्यात असलेल्या ८१ एएआय-संचालित विमानतळांमध्ये तोट्याच्या रकमेनुसार संभाजीनगरच्या विमानतळाचा सातवा क्रमांक आहे. पुणे, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, जयपूर-उदयपूर, इंदूर, वाराणसी आणि मुंबई या शहरांशी तसेच जपान व आखाती देशांशी थेट हवाई संपर्काची मागणी होत आहे.
Leave a Reply