बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सुप्रीम कोर्टात शिवसेना वाद: शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडरची मागणी केली.

सुप्रीम कोर्टात शिवसेना वाद: शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी 2019 मध्ये कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारचाही दाखला दिला.

शिंदे गटाचा युक्तिवाद

या प्रकरणात दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही, शिंदेंच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही, असा युक्तिवाद यावेळी धृव मेहता यांच्याकडून करण्यात आला. तसेच युक्तिवाद करताना त्यांनी भाजप आणि शिवसेना युतीचाही दाखला दिला. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. परंतु निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ही युती तोडण्यात आली. ही युती तोडण्यात आल्याने पदाधिकारी नाराज झाले होते, असेही यावेळी धृव मेहता यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचेच सरकार होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकार वाचवण्यासाठी शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, म्हणजे हे सरकार कोसळलेच नाही, असा दावाही यावेळी धृव मेहता यांनी केला.

कपिल सिब्बल यांची रिजॉइंडरची मागणी

दरम्यान आज शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. मात्र त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात रिजॉइंडरची मागणी केली आहे. मला रिजॉइंडर द्यायचा आहे, त्यासाठी मला काही वेळ द्याल अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केली आहे. दरम्यान कपिल सिब्बल हे आता पुन्हा एकदा युक्तिवाद करणार असल्याने शिवसेना शिंदे गटाची चिंता वाढली आहे. रिजॉइंडरमध्ये कपिल सिब्बल नेमके काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी सलग तीन सुनावणींमध्ये युक्तिवाद केला होता. अखेर आज त्यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance