शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या कथित अपमानाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेत विरोधकांनी थेट महापौरांच्या दालनात जाऊन त्यांना जाब विचारला, तर नाशिकमध्येही या घटनेचे पडसाद उमटले आहेत.
महापौरांच्या दालनात गोंधळ
बाळासाहेबांचा अपमान झाला असताना सभागृहाचे कामकाज सुरू का ठेवले, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावर महापौरांच्या दालनात विरोधकांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी दालनात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. महापौरांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे नगरसेवकही दालनात दाखल झाले. त्यामुळे भाजप नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने दालनात जोरदार गोंधळ निर्माण झाला आणि काही वेळातच वातावरण चांगलेच तापले.
नाशिकमध्ये मनसेची आक्रमक भूमिका
या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांचा फोटो फाडण्याचा इशाराही मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणावरून नाशिकमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
महापौरांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिवसेना नेत्या शायना एनसी विधानभवनात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या घटनेबाबत त्यांना बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात शायना एनसी यांची भूमिका काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. सभा तहकूब करा, अशी पेडणेकरांनी मागणी केली होती. पण सभागृह तहकूब होणार नाही, असे आम्ही विरोधकांना सांगितले. सभागृह तहकूब न केल्याने विरोधकांकडून वॉकआऊट करण्यात आले, असे रितू तावडे म्हणाल्या आहेत.
Leave a Reply