रेल्वे प्रवास म्हटला की आराम आणि सोय या दोन्ही गोष्टी डोळ्यांसमोर येतात. दूरचा प्रवास रेल्वेनेच करण्याकडे बहुतेक प्रवाशांचा कल असतो. प्रवासात गरमागरम जेवण मिळणे हीही रेल्वेची मोठी सोय आहे. तिकीट बुक करतानाच जेवणाचा पर्याय निवडता येतो आणि 20 ते 30 तासांच्या प्रवासातही ताजे जेवण मिळते. आतापर्यंत रेल्वेत वरण-भात, फुलके, पनीरची भाजी, सलाड, दही आणि गोड पदार्थ दिला जात असे. आता मात्र मुंबई-बंगळूरू वंदे भारत शयनयान एक्सप्रेसच्या प्रवाशांना अस्सल महाराष्ट्रीय जेवण मिळणार आहे.
मेनूमध्ये काय काय मिळणार?
पुरणपोळीपासून थेट झुणका-भाकरी आणि वांग्याचे झणझणीत भरीतही या मेनूमध्ये असणार आहे. झुणका म्हणजेच पीठलं. भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ म्हणजेच आयआरसीटीसी याचे नियोजन करत आहे. महाराष्ट्रीय घरात सणावाराला पुरणपोळी बनते आणि ती जवळपास सर्वांनाच आवडते. त्यासोबत झणझणीत वांग्याचे भरीत आणि झुणका मिळणार आहे.
निर्णय कसा झाला?
राज्याची खाद्यसंस्कृती प्रवाशांपर्यंत पोहोचवणे हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे. आयआरसीटीसीने प्रवाशांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी चाचण्या घेतल्या. त्यात पुरणपोळी सर्वाधिक पसंतीची ठरली. रेल्वे मंडळाच्या खानपानविषयक नियमांमध्ये बसणाऱ्या पदार्थांची निवड करून त्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. रेल्वे मंडळाने या पदार्थांना मंजुरी दिल्यानंतर ते प्रत्यक्षात प्रवाशांना मिळू लागतील. आतापर्यंत जेवणात पनीरची भाजी किंवा मिक्स व्हेज हेच पर्याय दिसायचे. आता त्यात बदल होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईहून बंगळूरूला जाणाऱ्या वंदे भारत शयनयान एक्सप्रेसमध्ये ही सुविधा मिळणार असून, प्रवासात पुरणपोळीसह झुणका-भाकरीचा आस्वाद घेता येणार आहे.
Leave a Reply