राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १६२ अधिकृत सभासद सचिवांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही सामूहिक विमा योजना राबवण्यात आली असून संपूर्ण समूहाला ८१ कोटी रुपयांचे विमा कवच मिळाले आहे.
हप्ता संघाने स्वतःच्या निधीतून भरला
या विम्यासाठी प्रति सभासद वार्षिक १ हजार १८० रुपये हप्ता निश्चित करण्यात आला आहे. १६२ सभासदांचा एकूण १ लाख ९१ हजार ११५ रुपयांचा विमा हप्ता सचिव संघाने स्वतःच्या निधीतून भरला आहे. त्यामुळे सभासद सचिवांना वैयक्तिकरीत्या विमा हप्त्याचा आर्थिक भार सोसावा लागणार नाही. सचिव संघाचे अध्यक्ष विलासराव पुंडकर, उपाध्यक्ष पराग दाते, सरचिटणीस शंकरराव सोनवलकर आणि कार्यकारिणी संचालक मंडळाच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सचिवांच्या दैनंदिन कामकाजातील जोखीम लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
विम्यात काय समाविष्ट आहे
या विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आणि अपघाती रुग्णालयीन उपचारांचा समावेश आहे. तसेच प्राणी, साप किंवा कीटकांच्या दंशावरील उपचार आणि दुर्घटनेत मृतदेह वाहून नेण्यासाठी विशेष आर्थिक मदतीचेही संरक्षण देण्यात आले आहे. शेतकरी आणि बाजार समित्यांच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सचिवांच्या सुरक्षिततेसाठी संघाने घेतलेल्या या निर्णयाचे राज्यातील सचिव वर्गातून स्वागत होत आहे.
Leave a Reply