निवृत्ती म्हणजे कामातून मुक्ती असे अनेकांना वाटते. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरही सक्रिय राहू इच्छितात. कोणाला आर्थिक गरज असते, तर कोणाला वर्षानुवर्षे मिळवलेला अनुभव आणि कौशल्य वापरायचे असते. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) पोर्टलवर विशेष री-एम्प्लॉयमेंट मोहीम सुरू आहे.
एनसीएस पोर्टल म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून चालवले जाणारे एनसीएस पोर्टल हे डिजिटल व्यासपीठ आहे. नोकरी शोधणारे आणि रोजगार देणाऱ्या कंपन्या यांना एकाच मंचावर आणणे हा याचा उद्देश आहे. येथे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांबरोबरच जॉब फेअर, करिअर समुपदेशन, कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाची माहिती मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी पोर्टलवर विशेष री-एम्प्लॉयमेंट मोहीम चालवली जात आहे.
कोणत्या क्षेत्रांत संधी मिळू शकतात?
निवृत्तीनंतर नोकरी शोधणारे आपल्या मागील काम आणि कौशल्यानुसार पर्याय शोधू शकतात. बँकिंग किंवा अकाउंट्समध्ये काम केलेल्यांना आर्थिक सल्ला, अकाउंटिंग आणि संबंधित भूमिका मिळू शकतात. शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेल्यांना शिकवणे, प्रशिक्षण देणे किंवा शैक्षणिक मार्गदर्शनाची कामे मिळू शकतात. प्रशासकीय अनुभव असलेल्यांना कार्यालय व्यवस्थापन, सल्लागार सेवा आणि पर्यवेक्षणाच्या भूमिका उपयुक्त ठरू शकतात. तांत्रिक क्षेत्रात काम केलेल्यांसाठी प्रशिक्षण, सल्लागार आणि प्रकल्पाशी संबंधित संधी आहेत.
घरबसल्या नोंदणी कशी करावी?
आधी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. मुख्य पृष्ठावरील ‘जॉबसीकर्स’ विभागात जाऊन ‘रजिस्टर’ हा पर्याय निवडा. नोंदणीदरम्यान वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव आणि कौशल्याची माहिती नोंदवा. प्रोफाइल पूर्ण झाल्यावर आवडीचे क्षेत्र आणि नोकरीचे ठिकाण निवडा. त्यानंतर ‘सर्च फॉर जॉब्स’ या पर्यायाने उपलब्ध नोकऱ्या पाहा. नोंदणी, अर्ज किंवा मुलाखत प्रक्रियेसाठी पोर्टलवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
Leave a Reply