लोकप्रिय मालिकांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खूपच खास ठरणार आहे. येत्या भागांमध्ये अनेक नवे वळणं येणार असून, काही पात्रांच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. नात्यांमधील गुंता, कुटुंबातील मतभेद आणि नव्या आव्हानांचा सामना अशा अनेक घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
गुरुकुलात नवा ट्विस्ट; नात्यांमध्ये नवे वळण
बालदिनानिमित्त अबीर आणि ओवी गुरुकुलमधील मुलांसोबत आनंदाने दिवस साजरा करतात. याच आनंदाच्या वातावरणात सावली गुरुकुलसाठी नवी जागा मिळवण्यात यशस्वी होते. मात्र नव्या जागेवरील गुरुकुलच्या पहिल्याच दिवशी वाडेकर मोठी खेळी खेळतात आणि स्वतःला गुरुकुलचा नवा मालक असल्याचे जाहीर करतात. त्यांच्या या घोषणेमुळे गुरुकुलसमोर कोणती नवी आव्हाने उभी राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रमा पहिल्यांदाच सिद्धूला ‘बाबा’ म्हणून हाक मारते. दुसरीकडे जयंत जान्हवीला न सांगता गुपचूप जानूला भेटायला जातो. पाडव्याला जान्हवी आणि भाऊबीजेला लक्ष्मी, अशा दोघींकडूनही दिग्विजयचे औक्षण होणार आहे. दरम्यान, आनंदी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करते. मात्र सिद्धू आणि भावना तिच्या या निर्णयाला विरोध करतात. नाराज झालेली आनंदी घर सोडून लक्ष्मीकडे राहायला जाते आणि त्यामुळे सिद्धू व भावना यांच्यात मोठे भांडण होणार आहे.
‘धाकट्या सुनबाई’मध्ये पाणीदानाचा ट्रॅक महत्त्वाच्या वळणावर आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि टँकरवरून निर्माण झालेला वाद यामुळे गावातील वातावरण तापले आहे. या घडामोडींदरम्यान राधिका आणि वेदांत यांच्यातील प्रेमळ व भावनिक क्षणही पाहायला मिळणार आहेत. पाडव्याच्या निमित्ताने वेदांतच्या प्रोत्साहनामुळे राधिका पहिल्यांदाच सर्वांसमोर बासरी वाजवणार आहे. दुसरीकडे गोदाक्का राधिकाच्या लग्नाची तयारी सुरू करते.
‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये कृष्णाई घरी परतल्यानंतर तिला लक्ष्मीपूजन करण्याचा आग्रह केला जातो. पूजेदरम्यान अशक्तपणामुळे तिचे हात थरथरू लागतात, तेव्हा शंकर आणि गौरी तिचे हात घट्ट धरून तिला आधार देतात. भाऊबीजेच्या निमित्ताने इंदुराणी आपल्या पतीला कृष्णाईच्या दारात घेऊन येते आणि त्याचे औक्षण करते. यावेळी तिन्ही मुली आपल्या आईला पदव्या आणि आयुष्यात मिळवलेल्या यशाच्या रूपात अनोखी ओवाळणी देतात.
तारिणीसमोर मोठे आव्हान; कमळीमध्ये नवा तणाव
‘कमळी’मध्ये अन्नपूर्णा आजी घरात फॅमिली बोर्ड मीटिंग बोलावते, त्यामुळे घरातील वातावरणात उत्सुकतेसोबत तणावही निर्माण होतो. ऋषी बंडखोर वृत्तीने कमळीसोबत आपल्या कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करू लागतो आणि या निमित्ताने दोघांमधील जवळीक वाढते. मात्र ऋषी आणि कमळीला एकत्र पाहून नयनताराला मोठा धक्का बसतो. ‘तारिणी’मध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने युवराज कौशिकीचा अपमान करतो, तेव्हा केदार त्याच्या कानाखाली लगावतो. दिवाळीनंतर कव्याच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच तारिणीसमोर नवे आव्हान उभे राहते — शाळेच्या बसमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली जाते. आता सीईओ झालेल्या दयानंदच्या परवानगीने युवराज या घटनेचे अतिरंजित वार्तांकन करतो, त्यामुळे तारिणीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार, हे पाहणे थरारक ठरणार आहे.
Leave a Reply