दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या प्रकरणावरून सरकारला थेट सवाल केले आहेत. अजित पवार यांचा मृत्यू नेमका अपघात होता की त्यामागे घातपात होता, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताला अनेक महिने उलटून गेले आहेत, तरी या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे जाधव म्हणाले. रोहित पवार हे सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणाबाबत स्पष्ट माहिती समोर येत नसल्याचा आरोपही जाधव यांनी केला.
मफलर मॅनवरही प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मफलर मॅनच्या मुद्द्यावरही भास्कर जाधव यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र व्हीएसआर कंपनीच्या मालकांसोबत असल्याचे दाखवत रोहित पवार यांनी फडणवीस हेच मफलर मॅन असल्याचे सांगितले आहे. यावर जाधव यांनी फडणवीस यांचे नाव न घेता संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तपासला पाहिजे, अशी भूमिका मांडली.
शिवसेनेतील फुटीच्या काळातील घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. सुरुवातीला या घडामोडींशी आपला संबंध नाही, अशी भूमिका घेतली जात होती. मात्र नंतर पडद्यामागे नेमके काय घडले, याबाबत संबंधितांकडूनच माहिती समोर आली होती, असे जाधव म्हणाले. कानटोप्या आणि मफलर घालून एकमेकांना भेटण्याच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे मफलर मॅनच्या मुद्द्यावरही अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासाचे सत्य कधी समोर येणार?
दरम्यान, या प्रकरणात रोहित पवार यांनी २३ मार्च २०२६ रोजी बंगळुरू येथे शून्य एफआयआर दाखल केली होती. ही एफआयआर पुढे महाराष्ट्राकडे वर्ग करण्यात आली असून सीआयडीने सुरू असलेल्या तपासात तिचा समावेश केला आहे. मात्र अपघातामागे तांत्रिक त्रुटी, निष्काळजीपणा की अन्य काही कारण आहे, याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.
Leave a Reply