कोणासोबत फोटो असणे किंवा कोणाच्या लग्नात जाणे म्हणजे त्यांना पाठिंबा देणे नव्हे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबाबत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर शिंदे यांनी हे उत्तर दिले. बोलणाऱ्यांसोबत किती जणांचे फोटो आहेत, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत करा, राजकारण नको
राज्यात दुष्काळ पडला असून शेतकरी संकटात आहेत, त्यांना मदत करा, असे आवाहन शिंदे यांनी केले. शेतकऱ्यांना एक बिस्किटचा पुडाही देता येईल, ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर सर्वांनी मिळून त्यांना मदत करण्याची वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नाही, असेही शिंदे म्हणाले. विरोधकांना मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असेही शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या टिकेलाही उत्तर
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर केलेल्या टिकेचाही समाचार घेतला. २०१९ मध्ये महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसोबत खोटे बोलून आणि त्यांचा विश्वासघात करून शिवसेना-भाजप युतीचे सरकार होण्यापासून रोखण्यात आले, असा आरोप शिंदे यांनी केला. २०१९ मध्ये युतीचे सरकार व्हायला पाहिजे होते, मात्र खुर्ची आणि पदासाठी जनतेशी खोटे बोलण्यात आले, असे शिंदे म्हणाले. त्यामुळे अमित शहांना खोटारडे म्हणण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असा टोला शिंदे यांनी लगावला. उद्धव ठाकरे हेच खोटे बोलण्यात आघाडीवर असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. मोदी आणि शहांवर टीका केली की मथळा बनतो आणि खोटे बोलूनही माध्यमांत राहण्याचा प्रयत्न होतो, अशी विरोधकांची पद्धत असल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील जनतेला त्यांचा खोटारडेपणा कळलेला असल्याचे शिंदे म्हणाले.
Leave a Reply