परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डात गुरुवारी, १९ नोव्हेंबरपासून खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदीला प्रारंभ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लिलावाची प्रक्रिया आणि वेळेचे नियम
मार्केट यार्डात कापसाची वाहने आल्यानंतर ती क्रमवार लावून जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस घेऊन जावे. कोणत्याही परिस्थितीत जिनिंग आवारात परस्पर वाहने घेऊन जाता येणार नाहीत. सकाळी ११ वाजेपर्यंत टीएमसी मार्केट यार्डात कापूस आणणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.
प्रतवारी आणि अधिकृत व्यापाऱ्यांकडेच विक्री
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस स्वच्छ स्वरूपात असावा. चांगल्या व खराब प्रतीचा कापूस वेगवेगळा करून आणल्यास संबंधित कापसाला योग्य व अधिक बाजारभाव मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची प्रतवारी करूनच विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात काही व्यापारी विनापरवाना शेतमालाची खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा. अनधिकृत व्यापाऱ्यांकडून होणारी खरेदी-विक्री टाळून अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच शेतमालाची विक्री करावी व अधिकृत हिशेबपावती घ्यावी, असेही आवाहन सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, संचालक मंडळ व सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.
Leave a Reply