नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे फळपिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या योजनेत मुरूड तालुक्यातील पात्र काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
काजू-आंब्यासाठी विमा संरक्षण
योजनेअंतर्गत काजू पिकासाठी ११ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी हा विमा कालावधी असून, प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम एक लाख २० हजार रुपये आणि शेतकरी हिस्सा चार हजार ८०० रुपये आहे. आंबा पिकासाठी १ डिसेंबर ते ३१ मे हा कालावधी असून, विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार रुपये आणि शेतकरी हिस्सा आठ हजार ५०० रुपये आहे.
अर्जाची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर
विमा अर्जासाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. अर्जासोबत सातबारा उतारा, आधारकार्ड, फार्मर आयडी, जिओ टॅगिंग केलेला छायाचित्र पुरावा, स्वयंघोषणापत्र आणि बँक खात्याचे तपशील आवश्यक आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावर किंवा महा-ई-सेवा केंद्रामार्फत अर्ज करता येईल. पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करून फळबागांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Leave a Reply